बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान हा रुग्णालयातून दुसऱ्या घरी पोहचला आहे. तो तंदुरुस्त असल्याचे कालच्या दृश्यातून समोर आले आहे. १६ जानेवारी भल्या पहाटे घरात घुसून त्याच्यावर हल्लेखोराने सहा वार केले होते. त्यानंतर चार दिवस आरोपीला ठाण्यातून पोलिसांनी अटक केली होती. जीवघेण्या हल्ल्यानंतर पाच दिवसांनी सैफला २१ जानेवारी रोजी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. अभिनेता घरी परतताच त्याच्या सुरक्षिततेसाठी नवीन सुरक्षा टीम नियुक्त करण्यात आली आहे. आता एकंदर या घटनेवरून आणि सैफला पाच दिवसांत डिस्चार्ज मिळण्यावरून शिवसेना नेते संजय निरुपम यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. रुग्णालयातून बाहेर पडताच सैफ इतका फिट कसा, असा सवाल त्यांनी केला आहे. (sanajy nirupam on saif ali khan attack)
एबीपीला दिलेल्या मुलाखतीत संजय निरुपम यांनी असं म्हटलं की, “सैफ अली खान आणि त्याच्या पूर्ण परिवाराबद्दल मला सहानुभूती आहे. त्याच्यावर जो प्रसंग ओढावला त्यातून तो लवकर बरा व्हावा म्हणून मी देवाकडे प्रार्थना करतो. मी याबद्दल अशासाठी प्रश्न उपस्थित केला की, त्याच्यावर जेव्हा हल्ला झाला तेव्हा मुंबई शहराच्या कायदे आणि व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केले गेले. गृहमंत्र्यांच्या कामाकाजावर प्रश्न उपस्थित केले गेले. शिवाय मुंबई पोलिसही काम करत नसल्याचे म्हटलं गेलं. शिवाय मनोरंजन विश्वातील अनेक कलाकारांनीही आमच्या जीवाला धोका असल्याचे म्हटलं.
यापुढे संजय यांनी असं म्हटलं की, “मी आता बघत आहे की, सैफ अली खानवर इतका मोठा हल्ला झाला आणि डॉक्टरांनी त्याच्या शरीरातून चाकूचा तुकडा काढला. तर डिस्चार्ज मिळाल्यानंतर तो इतक्या मजेत कसा काय चालत येत होता. हे शक्य आहे का? कदाचित शक्य असेलही कारण सैफ अली खान रोज नियमित व्यायाम करतो. पण त्यामुळेच मी आता वैद्यकीय जाणकरांना याबद्दल प्रश्न विचारु इच्छितो की हे शक्य आहे का? कारण, सैफ अली खान हे काय सामान्य नाव नाही. तो एका मोठ्या घराण्यातील व्यक्ती आहे. शिवाय हिंदी मनोरंजन विश्वातील एका मोठ्या घराण्याचा तो जावईही आहे. त्यामुळे अशा व्यक्तीवर जेव्हा हल्ला होतो तेव्हा मुंबईकर चिंतेत पडतात”.
यापुढे संजय यांनी असं म्हटलं की, “मुंबईकरांच्या या चिंतेमागचं खरं कारण काय ते समोर आलंच पाहिजे. म्हणून याप्रकरणी सैफ आणि करीना यांनी स्वत: समोर येऊन काय ती प्रतिक्रिया दिली पाहिजे. हे सगळं थांबवा आणि माझ्या परिवाराला सोडा असं म्हणून चालणार नाही. ज्याप्रकारे चोराचे फुटेज समोर आले तसंच जखमी सैफचे आणि त्याला घेऊन जाणाऱ्या कोणत्याही मुलांचे सीसीटीव्ही समोर का आले नाही. माझ्यासारख्या अनेक मुंबईकरांच्या मनात जे प्रश्न आहेत तेच प्रश्न मी विचारत आहे”. दरम्यान, संजय निरुपम यांनी पोलिसांच्या चौकशीवर प्रश्न उपस्थित करत हे संपूर्ण प्रकरण संशयास्पद असल्याचं म्हटलं आहे.