छोट्या पडद्यावरील प्रचंड गाजलेल्या ‘दिल दोस्ती दुनियादारी’ या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात घर केलं. मालिका संपून आता इतके दिवस झाले असले तरीही यातील प्रत्येक पात्र प्रेक्षकांच्या हृदयावर कायमस्वरूपी कोरलं गेलं आहे. मालिकेतील मीनल या पात्रालादेखील लोकांनी चांगलेच उचलून धरले. हे पात्र अभिनेत्री स्वानंदी टिकेकरने साकारले होते. या पात्रामुळे चर्चेत राहलेली ही अभिनेत्री तिच्या नुकत्याच पार पडलेल्या लग्नामुळे पुन्हा एकदा चांगलीच चर्चेत आली आहे.
स्वानंदी ही अभिनेते उदय टीकेकर व गायिका आरती अंकलीकर-टीकेकर यांची मुलगी आहे आणि स्वानंदीची आई अर्थात शास्त्रीय गायिका आरती अंकलीकर-टीकेकर यांचा आज जन्मदिवस आहे. यानिमित्ताने अभिनेते उदय टीकेकर यांनी त्यांच्या पत्नीसाठी खास पोस्ट शेअर केली आहे. उदय टीकेकर हे सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असतात. सोशल मीडियावर ते त्यांचे अनेक फोटो व व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असतात. अशातच त्यांनी त्यांच्या पत्नीसाठी केलेली ही खास पोस्ट सध्या चर्चेत आहे.
आरती टीकेकर यांच्या वाढदिवसानिमित्त उदय टीकेकर यांनी त्यांच्याबरोबरचा एक खास फोटो शेअर केला आहे. यात उदय टीकेकर पत्नीला किस करत आहेत आणि हाच खास फोटो शेअर करत त्यांनी पत्नीला वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. या फोटोखाली उदय टीकेकर यांनी “वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बायको, खुप सारे प्रेम” असं म्हणत शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांच्या या फोटोवर मराठीतील अनेक कलाकारांसह चाहत्यांनीही त्यांना कमेंट्समध्ये वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.
दरम्यान, उदय टीकेकर यांनी आपल्या प्रभावी अभिनयाने हिंदीसह मराठी प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केले आहे. उदय टीकेकर यांनी ‘जुळून येती रेशीमगाठी’ या मालिकेत साकारलेली भूमिका चांगलीच गाजली. “बाबाजी बाबाजी” म्हणणारा खलनायक प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस पडला. तर आरती टीकेकर यांनी त्यांच्या गायनाने रसिकांना मंत्रमुग्ध केले आहे. आरती यांनी आतापर्यंत भारतभर तसेच भारताबाहेर अनेक मानाच्या व प्रतिष्ठित संगीत महोत्सवांमध्ये त्यांची कला सादर केली आहे. त्याचबरोबर त्यांनी आपल्या सुमधुर गायनाने अनेक मानाच्या पुरस्कारांसह राष्ट्रीय पुरस्कारदेखील पटकावला आहे.