गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर सुप्रसिद्ध अभिनेत्रीच्या प्रेग्नेंसीबाबत बऱ्याच चर्चा समोर येत होत्या. अखेर या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे. गरोदरपणाच्या चर्चांमुळे चर्चेत असलेली अभिनेत्री म्हणजे देवोलीना भट्टाचार्जी. आता टीव्हीवरील ‘गोपी बहू’ म्हणजेच देवोलीना भट्टाचार्जीने या अटकळांना पूर्णविराम देत तिच्या गर्भधारणेची घोषणा केली आहे. लवकरच प्रेक्षकांची ही गोपी बहू खऱ्या आयुष्यात आई होणार आहे. अभिनेत्रीने पती शानवाजबरोबरचे फोटो सोशल मीडियावर शेअर करुन चाहत्यांना ही खुशखबर दिली. देवोलीना भट्टाचार्जी लग्नाच्या दीड वर्षानंतर आणि वयाच्या ३८ व्या वर्षी आपल्या पहिल्या मुलाचे स्वागत करणार आहे. (Devoleena Bhattacharjee announces pregnancy)
देवोलीनाने पती आणि कुटुंबाबरोबरच्या सेलिब्रेशनचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये अभिनेत्री, तिचा पती आणि तिचे संपूर्ण कुटुंब ‘साथ निभाना साथिया’ या मालिकेतील तिचे सहकलाकार देखील दिसत आहेत. हे फोटो शेअर करताना देवोलीनाने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “मी पवित्र पंचामृत विधीने आई बनण्याचा हा प्रवास सुरु करणार आहे. न जन्मलेल्या बाळाच्या आणि आईच्या चांगल्या आरोग्यासाठी हा विधी केला जातो”. देवोलीनाचा ‘पंचामृत’ विधी पार पाडत काही फोटो शेअर करत तिच्या आई होणार असल्याची आनंदाची बातमी दिली. या विधीसाठी देवोलीनाने हिरव्या रंगाची सुंदर साडी नेसली होती, तसेच लाल चुडा घातला होता. आणि सोन्याच्या दागिन्यांनी तिचा हा लूक पूर्ण केला.
आणखी वाचा – दिशा-पारुमध्ये होणार स्पर्धा?, कोण विजयी होणार?, अहिल्यादेवी योग्य तो न्याय देणार का?, मोठा ट्विस्ट
या फोटोंमध्ये देवोलिना हातात लहान मुलाचे कपडे धरून बसलेली दिसत आहे. तिने हातात धरलेल्या कपड्यांवर “आता तुम्ही विचारणे बंद करु शकता” असे लिहिले आहे. अभिनेत्रीच्या प्रेग्नेंसीबद्दल चाहत्यांमध्ये बऱ्याच दिवसांपासून चर्चा होती. मात्र, त्यावेळी गोपी बहूंनी या विषयावर काहीही बोलण्यास स्पष्ट नकार दिला होता. जेव्हा लोक तिला याबाबत प्रश्न विचारतात तेव्हा तिला खूप राग यायचा. हे तिचे वैयक्तिक आयुष्य आहे आणि जेव्हा तिला योग्य वाटेल तेव्हा ती आई होण्याबद्दल सर्वांना सांगेल, असंही तिने सांगितलं होतं.
देवोलीना भट्टाचार्जीने जिम ट्रेनर शानवाज शेखला काही वर्षे डेट केलं होतं, त्यानंतर हे दोघेही १४ डिसेंबर २०२२ रोजी लग्नबंधनात अडकले. दोघांनी नोंदणी पद्धतीने अगदी साधेपणाने त्यांचं लग्न केलं. या लग्नात दोघांचे कुटुंबीय व काही जवळचे लोक उपस्थित होते. आता लग्नानंतर दीड वर्षांनी देवोलीना व शानवाज आई-बाबा होणार आहेत.