Bigg Boss Marathi 5 : सध्या चर्चा आहे ती म्हणजे ‘बिग बॉस मराठी’ची. यंदाचे हे पाचवे पर्व असून दिवसेंदिवस या नवीन पर्वाची रंगत वाढताना दिसत आहे. या शोमध्ये आल्यावर अनेक स्पर्धक आपले मनं मोकळे करताना दिसतात. ‘बिग बॉसच्या घरात येणारे स्पर्धक हे त्यांच्या घरापासून, प्रिय व्यक्तीपासून लांब असतात. त्यामुळे अनेकदा त्यांना घरच्यांची आठवण येत असते आणि या आठवणीत ते भावुकही होतात. घरातील इतर स्पर्धकांकडे ते आपल्या भावना व्यक्त करतात. यावेळी त्यांना रडूही येतं. साहजिकच घरच्यांची आठवणीमुळे त्यांच्या डोळ्यातून अश्रु वाहू लागतात. अशातच ‘बिग बॉस मराठी’च्या नवीन पर्वातील स्पर्धकही घरच्यांच्या आठवणीत भावुक होणार आहेत. (Bigg Boss Marathi 5 New Promo)
कलर्स मराठीच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे, ज्यामध्ये घरातील सर्व स्पर्धक त्यांच्या प्रिय व्यक्तींच्या खास आठवणीत भावुक झाल्याचे पाहायला मिळत आहे. या नवीन प्रोमोमध्ये वर्षा उसगांवकर, अंकिता वालावालकर, सूरज चव्हाण, पॅडी कांबळे, घन:श्याम दरवडे, जान्हवी किल्लेकर, निक्की तांबोळी व अरबाजसह सगळेच भावुक झाले असल्याचे पाहायला मिळत आहे. या घरात ‘बिग बॉस’ घरातील स्पर्धकांना त्यांच्या प्रिय व्यक्तींना फोन लावून द्यायला सांगणार आहेत.
वर्षा यांनी त्यांच्या वडिलांना फोन लावताच “आज मला तुझी खूप आठवण येत आहे पप्पा” असं म्हणतात आणि रडू लागतात, तर अंकिता “तुझ्याबरोबर शेवटचं बोलायचं राहील अरे” असं म्हणत ढसाढसा रडते. तर सूरजही त्याच्या आईच्या आठवणीत खूपच भावुक झाला आहे. यावेळी तो आपल्या आईच्या आठवणीत “तुझ्या लेकराला आता कोण सांभाळणार गं?” असं म्हणत आहे.
दरम्यान, बिग बॉसच्या घरात कायमच राडे, हाणामारी, वाद, भांडण पाहायला मिळतं. खेळ व टास्क जिंकण्यासाठी स्पर्धक अक्षरश: एकमेकांच्या जीवावर धावून जातात. ‘बिग बॉस’च्या नवीन पर्वातही सुरुवातीपासूनच भांडण वाद पाहायला मिळाले. अशातच आता हा नवीन प्रोमो प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे. या घरातील सर्व स्पर्धकांना भावुक होताना पाहून चाहतेही भावुक होतील हे नक्की…