Tula Shikvin Changlach Update : ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ मालिकेमध्ये आता कुठे अधिपती आणि अक्षराच्या प्रेमाचा नवा अध्याय सुरु झाल्याचं पाहायला मिळत होतं. मात्र आता पुन्हा या दोघांच्या नात्यात दुरावा येण्यासारखी परिस्थिती निर्माण होताना पाहायला मिळणार आहे. ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ मालिकेत अधिपती-अक्षरा यांच्या नात्यात दुरावा येणार आहे. अक्षरा व अधिपती हनीमूनवरून कोल्हापुरात परातले आहेत. घरात आल्यावर अधिपतीला चारुहासने भुवनेश्वरीला घरातून हाकलून दिल्याची घटना कळते. ते ऐकून अधिपती अत्यंत चिडतो. हेच कारण की, अधिपती आणि अक्षरा हनिमूनला निघाले असताना चारुहास अक्षराला कॉल करतो आणि तिला सांगतो की, तिने कोणत्याही परिस्थितीत अधिपतीशी भुवनेश्वरीला फोनवर बोलू देऊ नये. (Tula Shikvin Changlach Dhada Serial Update)
चारुहासने भुवनेश्वरीला घरातून हाकलून देण्याची योजना आखल्याचा आणि योजनेचा एक भाग म्हणून जाणूनबुजून त्याला व अक्षराला हनिमूनसाठी पाठवल्याचा आरोप अधिपती करतो. थायलंडवरुन परत आल्यानंतर अधिपती “आईसाहेब घरात दिसत का नाहीत?” हे विचारतो. यावर त्याला चारुहासने आपल्या आईला घराबाहेर काढलं असल्याचं कळतं. त्यामुळे आईला घराबाहेर काढल्याचा राग येऊन अधिपती वडिलांच्या अंगावर धावून जातो. अधिपती चारुहासचा गळा पकडत “तुमची हिंमत कशी झाली?” असा थेट प्रश्न विचारतो. मात्र या दोघांमध्ये अक्षरा येते आणि अधिपतीला अडवते.
अधिपतीचे चारुहासबरोबर भांडण होते. तसंच अधिपती व अक्षरा यांच्यातही मोठा वाद होतो. अधिपती भुवनेश्वरीचा शोध घेण्यासाठी घराबाहेर पडतो आणि पोलिस तक्रार ही दाखल करतो. मात्र त्याला भुवनेश्वरी कुठेही दिसत नाही. म्हणून तो पुन्हा घरात येतो आणि आईवरच्या अतिप्रेमामुळे तो चारुहास व अक्षराला घराबाहेर काढतो. झी मराठीच्या सोशल मीडिया अकाऊंटद्वारे या नवीन ट्विस्टचा प्रोमो शेअर करण्यात आला आहे. यात अधिपती चारुहाससह अक्षरालाही घराबाहेर काढतानाचे पाहायला मिळत आहे.
त्यामुळे आता अधिपती भुवनेश्वरीचा शोध घेऊ शकेल का? अधिपती-अक्षरा यांच्यामध्ये चारुहासमुळे गैरसमज निर्माण होणार का? आगामी भागांमधून प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. दरम्यान, ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ ही मालिका प्रेक्षकांची आवडती मालिका आहे. या मालिकेत अभिनेत्री शिवानी रांगोळे व अभिनेता ऋषिकेश शेलार यांची फ्रेश ऑनस्क्रीन जोडी प्रेक्षकांना पाहायला मिळाली. मालिकेत अभिनेत्री शिवानी रांगोळेने अक्षरा तर, अभिनेता ऋषिकेश शेलारने अधिपती हे पात्र साकारलं आहे.