ठाण्यातील घोडबंदर रोड हा एक महत्त्वाचा मार्ग आहे. या मार्गावरून रोज लाखोंच्या संख्येत वाहनांची ये-जा होत असते. याच मार्गावरुन मुंबई, पालघरसह गुजरातमध्ये जाणाऱ्या गाड्यांची ये-जा सुरु असते. अत्यंत महत्वाच्या या रस्त्यावर नेहमीच वाहतूक कोंडी असते. यामुळे या मार्गावरुन जाणाऱ्या अनेकांना या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. सामान्य जनतेसह मराठी मनोरंजन विश्वात काम करणाऱ्या कलाकरांनाही या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. याबद्दल अनेक मराठी कलाकार त्यांच्या प्रतिक्रिया व्यक्त करत असतात. अशातच अभिनेत्री ऐश्वर्या नारकर यांनीही या वाहतूक कोंडीवर त्यांची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. (Aishwarya Narkar is stuck in the traffic)
ऐश्वर्या नारकरांनी त्यांच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक व्हिडीओ शेअर केला आहे आणि या स्टोरीद्वारे त्यांनी ठाणे-घोडबंदर रोडवरील वाहतूक कोंडीची समस्या दाखवून दिली आहे. ऐश्वर्या यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे व्हिडीओ शेअर करत असं म्हटलं आहे की, “काय करायचं या ठाणे-घोडबंदर रोडवरील ट्राफिकचं. आता तर मी प्रेमात पडायलं लागले आहे. रस्ता न होण्यामागे आणि ट्राफिक असण्यामागे प्रत्येकाची बाजू असेल. सरकारची बाजू असेल, राजकारण्यांची बाजू असेल किंवा ज्यांना कंत्राट मिळतं त्यांची बाजू असेल”.
यापुढे त्यांनी असं म्हटलं आहे की, “यात कामगारांची बाजू असेल. तिथे काम करणाऱ्या सर्वांची, तसंच ऊन, वारा, पाऊस या सगळ्यांची एक बाजू असेल. पण आपली पण एक बाजू आहे आणि ती बाजू कुणीतरी समजून घेतली पाहिजे. पैसा, वेळ, शक्ती, निराशा, वेळेत पोहोचण्याचं टेन्शन या सगळ्यासाठी आता आपली बाजू समजून घेणं गरजेचं आहे” असं म्हटलं आहे. ऐश्वर्या यांनी शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये ठाणे-घोडबंदर रोडवरील प्रचंड मोठी वाहतूक कोंडी दिसत असून लांब लांबपर्यंत वाहनांच्या रांगा दिसत आहेत.
काही दिवसांपूर्वी अभिनेता शशांक केतकरनेदेखील या मार्गावरील वाहतूक कोंडीचा एक व्हिडीओ शेअर केला होता. शशांकने हा व्हिडीओ शेअर करत “मीरारोड आणि ठाण्याच्या मध्ये लोणावळ्याचा फील येण्यासाठी ही ट्रॅफिकची योजना आखली आहे” असं शशांकने उपरोधिकपणे म्हटलं होतं. अशातच आता ऐश्वर्या यांनीही या वाहतूक कोंडीची समस्या मांडली आहे. दरम्यान, दरम्यान, ऐश्वर्या यांच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर त्या सध्या ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेतून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहेत