‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘नवरी मिळे हिटलरला’ ही मालिका जेव्हापासून सुरु झाली तेव्हापासून या मालिकेने प्रेक्षकांना खुर्चीत खिळवून ठेवलं. एकूणच मालिकेत एक वेगळाच प्रवास पाहायला मिळत आहे. लग्नानंतर लीला एजेंच्या घरी चांगली रुळू लागलेली पाहायला मिळत आहे. तर आता लीलाने तिच्या तिन्ही सूनांनाही आता बोटावर नाचवायला सुरुवात केली आहे. तर इकडे एजे व लीला यांचा लुटुपुटुचा भांडण असलेला प्रवास सुरु झाला आहे. दोघेही एकमेकांची एकमेकांच्या नकळत काळजी घेताना दिसत आहेत. (Navari Mile Hitlerla New Promo)
एजे व लीला एकीकडे एकमेकांची काळजी घेताना दिसत आहेत. एजेंच्या मते ही माणुसकी असली तरी एजे यांच्याकडून लीलाची घेतली जाणारी काळजी तिला आवडू लागली आणि आता लीलानेही मनाशी ठामपणे निर्णय घेतला आहे की, मी आता यापुढे एजेंना समजून घेणार आहे. आणि याची सुरुवात तिने एजेंच्या खोलीत शिरुन केली आहे. एकत्र राहिलो तरच लीला एजेंना समजून घेईल असं तिला वाटत आहे. अशारीतीने लीला व एजेंचा हा संसार सुरु झाला.
दरम्यान मालिकेत नुकतीच लीलाची लग्नानंतरची पहिली मंगळागौर साजरी करण्यात आली. लग्नानंतरच्या या पहिल्या मंगळागौरीनिमित्त लीलाचा खास अंदाज साऱ्यांच्या पसंतीस पडला. यावेळी लीलाने गुलाबी काठ असलेली अबोली रंगाच्या नऊवारी साडी नेसली होती. तर भरजरी असे दागिने तिने यावर घातले आहेत ते देखील लक्ष वेधून घेत आहेत. मंगळागौर कार्यक्रमात लीलाने घेतलेल्या भन्नाट उखाण्याने साऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. लीला या उखाण्याच्या माध्यमातून आजीला वचन देताना पाहायला मिळत आहे.
या प्रोमोमध्ये सर्व महिला मंगळगौर खेळताना दिसत आहेत. यावेळी लीला सगळ्यांसमोर उखाणा घेते की, “माझ्या लग्नाबद्दल सगळे काय ते हवं ते बोला पण हेच सत्य आहे की, मी घातलीये एजेंच्या गळ्यात वरमाळा. कोणाला आवडू दे किंवा न आवडू दे देवा मला हा संसार पेलवण्याची शक्ती दे. आजी एजेंचं नाव घेऊन वचन देते मी तुम्हाला तुमच्या प्रेमाचा मान ठेवेल ही लीला”, असा सुंदर उखाणा यावेळी लीलाने घेतला.