Bigg Boss Marathi 6 Winner : ‘बिग बॉस मराठी’ सिझन ६ चा काल फिनाले झाला. या दिवसाची सगळेच स्पर्धक आणि चाहते उत्सुकतेने वाट पाहत होते. अखेर काल ही उत्सुकता संपली. शंभर दिवसांचा हा खेळ संपला असून यंदाच्या पर्वाच्या विजेतेपदावर तन्वी कोलतेने आपले नाव कोरले. टॉप ५ स्पर्धकांमध्ये तन्वी कोलते, राकेश बापट, विशाल कोटियन, अनुश्री माने, दीपाली सय्यद हे स्पर्धक होते. या स्पर्धकांमध्ये अगदी शेवटच्या दिवसापर्यंत चुरशीची लढत पाहायला मिळाली. यंदाच्या या पर्वात तन्वीने
सर्वाधिक मत मिळवली. सध्या तन्वीच्या चाहत्यावर्गात उत्साहाचं, आनंदाचं वातावरण पाहायला मिळत आहे.
तन्वीला हा शो जिंकल्यावर बिग बॉस मराठी कडून ट्रॉफी आणि १५ लाखांचा चेक देण्यात आला आहे. याशिवाय पु.ना. गाडगीळ आणि सन्स यांच्याकडून तन्वीला १० लाखांचं Voucher आणि तुनवाल ई-मोटर्सकडून ई-बाईक देण्यात आली आहे. याशिवाय तन्वीला रितेशने ‘राजा शिवाजी’ चित्रपटाच्या टीमकडून छत्रपती शिवाजी महाराजांचं छायाचित्र असलेली फ्रेम भेट म्हणून दिली. सध्या सर्वत्र तन्वीच्या नावाची चर्चा सुरु असल्याच पाहायला मिळत आहे.
आणखी वाचा – “पुरुषी आवाजामुळे दिग्दर्शकाने अपमान केला”, मराठी अभिनेत्रीने व्यक्त केली खंत, म्हणाली, “इतका मोठा ट्रॉमा…”
ट्रॉफी जिंकल्यावर तन्वी म्हणाली, “१०० दिवसांनी ही ट्रॉफी माझ्या हातात आली. घरात एन्ट्री घेतल्यापासूनच मी ट्रॉफीचं स्वप्न पाहत होते. पण, जेव्हापासून ‘बिग बॉस मराठी’चा पहिला सीझन सुरु झाला होता, तेव्हापासूनच मी आई-बाबांना सांगत होते की, मला ‘बिग बॉस’मध्ये जायचं आहे. कारण, हा असा एक शो आहे जिथे आपल्याला आपल्या स्वतःच्या नावाने ओळख मिळते. आजवर मालिका, सिनेमातील नावाने लोक मला ओळखत होते पण, या शोमध्ये असं होत नाही. मला या शोची आधीपासूनच क्रेझ होती. तन्वी कोलते हे नाव लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ‘बिग बॉस’ हा माझ्यासाठी एकमेव प्लॅटफॉर्म होता. आज ‘बिग बॉस’मुळे माझं नाव इतके मोठं झालंय, आणि त्यांच्यामुळेच माझं स्वप्न पूर्ण झालंय. आले होते तन्वी कोलते म्हणून… आज जातेय तन्वी कोलते हा ब्रँड मिळवून थैंक्यू सो मच मला पाठिंबा देणाऱ्या सगळ्या चाहत्यांचेही खूप खूप आभार”.
‘बिग बॉस’च्या घरात आल्यानंतर तन्वीने अगदी पहिल्याच आठवड्यात घर गाजवलं. तन्वी कोलते, खूप बोलते असं तिला यावेळी अनेकांनी म्हटलं. भाऊच्या धक्क्यावर तर रितेश देशमुखनेही तिला यावरून झापलं. यानंतर मात्र तन्वीने स्वतःमध्ये बदल करत ‘तन्वी बोलते सबको कोलते’ असं म्हणत स्वतःला सिद्ध केलं.




