Heymal Ingley Engagement : आयपीएएल २०२४ मध्ये एका अँकरने सर्व क्रिकेटप्रेममींचे लक्ष वेधलं होतं ही अँकर म्हणजे मराठमोळी अभिनेत्री हेमल इंगळे. हेमल इंगळे ही एक अभिनेत्री आणि मॉडेल आहे, जी मराठी चित्रपटांमध्ये काम करते. हेमल इंगळेने मराठीसोबतच दाक्षिणात्य चित्रपटांमध्येही काम केले आहे. हेमलने एका हिंदी टीव्ही शो आणि एका हिंदी वेब सीरिजमध्येही काम केले आहे. आपल्या निरागस हास्याने व मनमोहक सौंदर्याने सर्वांच्या मनावर अधिराज्य गाजवण्याऱ्या हेमलने नुकताच साखरपुडा केला आहे. अभिनेत्रीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे खास फोटो शेअर करत तिच्या साखरपुड्याबद्दलची माहिती दिली आहे. (Heymal Ingley Engagement)
‘अशी ही आशिकी’ या चित्रपटामुळे हेमल इंगळे घराघरांत लोकप्रिय झाली. या चित्रपटात तिने अभिनय बेर्डेबरोबर स्क्रीन शेअर केली होती. सध्या हेमल तिच्या आगामी ‘नवरा माझा नवसाचा २’ या चित्रपटामुळे प्रचंड चर्चेत आहे. यामध्ये अभिनेत्रीला दिग्गज कलाकारांबरोबर काम करण्याची संधी मिळाली आहे. अशातच आपल्या कामांमुळे चर्चेत असणाऱ्या हेमलने तिच्या चाहत्यांना साखरपुड्याचा फोटो शेअर करत सुखद दिला आहे.
हेमलने इन्स्टाग्राम अकाऊंटवर तिच्या बॉयफ्रेंडबरोबरचे फोटो शेअर करत साखरपुड्याची माहिती दिली आहे. या फोटोमध्ये हेमलने निळ्या रंगाचा सुंदर ड्रेस, गळ्यात छानसा नेकलेस असा लूक केला आहे. तर तिच्या होणऱ्या नवऱ्यानेही तिच्या ड्रेसच्या रंगाला साजेसा कुर्ता परिधान केला आहे. हेमलच्या नवऱ्याचं नाव रोनक असं आहे. होणाऱ्या नवऱ्याबरोबरचा रोमँटिक फोटो शेअर करत तिने साखरपुड्याची गुडन्यूज दिली आहे. अभिनेत्रीने आयुष्याच्या या नव्या इनिंगला सुरुवात केली आहे. हेमलने शेअर केलेल्या या फोटोखाली तिच्या अनेक चाहत्यांसह मराठी कलाकारांनीही कमेंट्स करत शुभेच्छा दिल्या आहेत.
श्रिया पिळगांवकर, रिंकू राजगुरु, फुलवा खामकर, स्वप्नील जोशी, रसिका सुनील यांसारख्या अनेक कलाकारांनी अभिनंदन म्हणत शुभेच्छा दिल्या आहेत. दरम्यान, आपल्या कौशल्याने आणि स्टायलिश लूकने हेमल इंगळेने २०२४ च्या आयपीएल सीझनमध्ये धुमाकूळ घातला आहे. मैदानावरील षटकार आणि चौकारांसह पडद्यावरील हेमलच्या अँकरिंगने प्रेक्षकांची मने जिंकली. हेमलने प्रथमच क्रिकेटमध्ये अँकरिंग केले होते. अशातच ती आता लवकरचं नवरा माझा नवसाचा २ मधून प्रेक्षकांचे मनोरंजन करायला सज्ज आहे.