झी मराठीवरील ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ ही मालिका प्रचंड लोकप्रिय आहे. ही मालिका सध्या रंजक वळणावर आहे. गेल्या दीड वर्षांपासून शर्मिष्ठा राऊतची निर्मिती असलेली ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ ही मालिका प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करत आहे. या मालिकेचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे. ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’च्या निमित्ताने अभिनेत्री शिवानी रांगोळे व अभिनेता ऋषिकेश शेलार यांची फ्रेश ऑनस्क्रीन जोडी प्रेक्षकांना पाहायला मिळाली. मालिकेत अभिनेत्री शिवानी रांगोळेने अक्षरा तर, अभिनेता ऋषिकेश शेलारने अधिपती हे पात्र साकारलं आहे.
अधिपती हा श्रीमंत घरचा मुलगा असतो. तर, अक्षरा ही एका शाळेत शिक्षिका असते. त्यामुळे अधिपती तिला प्रेमाने ‘मास्तरीण बाई’ अशी हाक मारत असतो. त्याचं अक्षरावर मनापासून प्रेम असतं. सुरुवातीला या दोघांचं मनाविरुद्ध लग्न होतं. पण, आता काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या भागात अक्षराने अधिपतीसमोर आपल्या प्रेमाची कबुली दिली आहे. अक्षरा व अधिपतीच्या सुखी संसारात विघ्न आणण्यासाठी भुवनेश्वरी कायम नवनवीन डाव रचत असते. या दोघांनाही घराबाहेर काढून भुवनेश्वरीने त्यांची परीक्षा देखील घेतली. परंतु, आता लवकरच मालिकेत एक नवीन वळण येणार आहे.
चारूहास भुवनेश्वरीला घराबाहेर काढणार आहे. नुकताच मालिकेचा एक नवीन प्रोमो समोर आला आहे. ज्यामध्ये चारूहास तिला धमकी देत आहेत. मालिकेचा हा नवीन प्रोमो प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे. ज्यामध्ये चारूहास भुवनेश्वरीला “माझं घर टिकलं नाही तरी चालेल. पण या घरात तुझं अस्तित्व नको आहे. तू या घराला लागलेला श्राप आहेस” असं म्हणतात. यावर भुवनेश्वरी “तुम्ही काय मग आता मला घराबाहेर काढणार का?” असं म्हणते. यावर चारूहासदेखील “गरज पडली तर तेही करेन” असं म्हणतात.
आणखी वाचा – “घटस्फोटामुळे मी खूप आनंदी”, किरण रावचं मोठं वक्तव्य, म्हणाली, “आमिरबरोबरचं नातं…”
एकीकडे चारूहास भुवनेश्वरीला घराबाहेर काढायचा विचार करत आहेत, तर दुसरीकडे अधिपती मात्र त्याला आईपासून लांब राहणे सहन होत नसल्याचे अक्षराला सांगतो. “आम्हाला आईसाहेबांना सोडून कुठेही जायचं म्हटलं तर परदेशातच आहोत असं वाटतं” असं म्हणतो. त्यामुळे आता मालिकेत भुवनेश्वरी खरंच घर सोडून जाणार का? की तिची ही नवीन खेळी असेल हे आगामी भागात पाहायला मिळणार आहे.