‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ म्हणून ओळखला जाणारा बॉलिवूड अभिनेता आमिर खान व त्याची दुसरी पत्नी किरण राव हे दोघे तीन वर्षांपूर्वी वेगळे झाले. घटस्फोटामुळे आमिर व किरण खूप चर्चेत आले होते. मात्र, ही जोडी आजही एकत्र दिसत आहे. आयराच्या लग्नातही दोघे एकत्र आले होते. दोघांनी एकत्र कामही केलं आहे. आमिर व किरणने जुलै २०२१ मध्ये घटस्फोटाची घोषणा केली होती. पण घटस्फोटानंतर ती खूप खूश असल्याचे किरणचे मत आहे. किरणने नुकत्याच एका मुलाखतीत तिच्या घटस्फोटाबद्दल सांगितले. आमिर व त्याच्या कुटुंबियांनी घटस्फोटाला कसे समर्थन दिले हेदेखील सांगितले.
किरणने ‘फेय डिसूझा’ला दिलेल्या मुलाखतीत म्हटले की, “मला वाटते की नातेसंबंधांची वेळोवेळी व्याख्या करणे आवश्यक आहे कारण जसे आपण मोठे होतो तसतसे आपण माणूस म्हणूनही बदलत असतो. आम्हाला वेगवेगळ्या गोष्टींची गरज आहे आणि मला वाटले की, हा घटस्फोटाने मला आनंद होईल आणि प्रामाणिकपणे, यामुळे मला खूप आनंद झाला. मला अजिबात एकटं वाटत नाही. मला माझे स्वातंत्र्य आवडते. मी एकटी होते. पण आता मला स्वातंत्र्य मिळाल्यामुळे मला एकटे वाटत नाही”.
यापुढे ती असं म्हणाली की, “मला वाटते की बहुतेक लोकांना काळजी वाटते की जेव्हा ते घटस्फोट घेतात तेव्हा ते एकटे राहतील. पण मला अजिबात एकटं वाटत नाही. माझे व आमिरचे दोन्ही कुटुंब मला खूप पाठिंबा देतात. हा खूप आनंदी घटस्फोट झाला आहे”. किरण-आमिरसाठी १५ वर्षांचे वैवाहिक जीवन संपवणे सोपे नव्हते. याबद्दल किरणने सांगितले की, “माझे आणि आमिरचे नाते भावनिक आणि मानसिकदृष्ट्या संपवायला थोडा वेळ लागला. आम्ही दीर्घकाळ एकमेकांबरोबर आहोत याची आम्हाला खात्री आहे. त्यामुळे आम्हाला लग्न करुन एकत्र राहण्याची गरज वाटली नाही”.
दरम्यान, किरण व अमिरने २००५ साली लग्न केले होते. त्यानंतर एकमेकांबरोबर मतभेद झाल्यामुळे २०२१ साली त्यांनी घटस्फोट घेतला. पण घटस्फोट झाल्यानंतरही दोघे एकमेकांवर प्रेम करत असल्याचं अनेकदा पाहायला मिळालं आहे. अनेक कार्यक्रमांमध्ये ते दोघा सहभाग घेताना दिसतात.