काही लोकप्रिय मालिकांपैकी एक मालिका म्हणजे झी मराठीवरील ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ ही मालिका. या मालिकेत येणाऱ्या अनेक नवनवीन ट्विस्टमुळे ही मालिका प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. त्यामुळे आगामी कथानकाविषयी प्रेक्षकांना कायमच उत्सुकता लागून राहिलेली असते. ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ मालिकेत काही दिवसांपूर्वी अक्षरा व अधिपती यांच्या आयुष्यात चारुलताची एन्ट्री झालेली पाहायला मिळाली. अक्षरा-अधिपती हनिमूनला गेलेले असताना चारुहास भुवनेश्वरीला घराबाहेर काढतो. घरी पुन्हा आल्यावर अधिपतीला त्याची आई कुठेच दिसत नाही. त्यामुळे तो प्रचंड बैचेन होतो. सगळेजण भुवनेश्वरीचा शोध घेऊ लागतात. अशातच बाजारात एकेदिवशी अक्षराला चारुलता (अधिपतीची खरी आई) दिसते. (Tula Shikvin Changalach Dhada Serial Update)
चारुलताने सूर्यवंशांच्या घरात एन्ट्री केल्यानंतर अक्षरा व चारुहास यांनी तिला स्वीकारलं आहे. पण अधिपती चारुलताचा आई म्हणून स्वीकार करण्यास अजूनही तयार नाही. एकीकडे अधिपती चारुलताला स्वीकारण्यास तयार नाही पण दुसरीकडे अक्षरा मात्र त्या दोघांना एकत्र आणण्याचे प्रयत्न करत आहे. मालिकेच्या दोन दिवसांपूर्वी आलेल्या प्रोमोमध्ये चारुलता व भुवनेश्वरी एका मुखवट्यामागून अक्षराला त्या चारुलता व भुवनेश्वरी असल्याचे सांगतात. यामुळे अक्षरा संभ्रमात पडते. अक्षराच्या मनात संभ्रम निर्माण होत असतानाच आता मालिकेचा नवीन प्रोमो समोर आला आहे.
आणखी वाचा – The Great Indian Kapil Show वादाच्या भोवऱ्यात, निर्मात्यांवर गुन्हा दाखल करण्याची धमकी, नेमकं प्रकरण काय?
अशातच नुकताच प्रदर्शित झालेल्या एका प्रोमोने सर्वांचे लक्ष वेधून घेतलं आहे. बाजारात गेलेल्या अक्षराला भुवनेश्वरीची पाठमोरी झलक दिसते. नऊवारी साडी, अंगावर शाल, केसात गजरा, भरजरी दागिने, हातात सोन्याच्या अंगठ्या असा सासूचा भुवनेश्वरीचा लूक अक्षराला दिसतो. पण ती जवळ जाताच भुवनेश्वरी अचानक गायब होते. या प्रोमोमुळे आता पुन्हा एकदा मालिकेत भुवनेश्वरी दिसणार असल्याचं निश्चित झालं आहे.
दरम्यान, मालिकेच्या या नवीन प्रोमोमुळे प्रेक्षकांमध्ये चांगलीच उत्सुकता निर्माण झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून भुवनेश्वरी गायब आहे. ती गायब झाल्यानंतर चारुलताची एन्ट्री झाली आहे. अक्षरा तिची भेट घेण्यात यशस्वी होणार का? ही लवकरच प्रेक्षकांसमोर येणार आहे. मालिकेत भुवनेश्वरीची एन्ट्री ६ नोव्हेंबरच्या भागात होणार आहे.