‘बिग बॉस मराठी’ चं पाचवं पर्व प्रचंड गाजलं. यामुळे ‘बिग बॉस’च्या घरातील सदस्यही चर्चेत आले. ‘बिग बॉस’च्या घरात पहिल्या दिवसापासून वादावादी, मैत्री आणि भांडण पाहायला मिळालं. पण त्याचबरोबर ‘बिग बॉस’च्या घरात स्पर्धक म्हणून सहभागी झालेले सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर धनंजय पवार यांनी त्यांच्या विनोदी शैलीने प्रेक्षकांची मनं जिंकली. धनंजय हे आपल्या आई व बायकोबरोबरचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असतात. त्यांच्या व्हिडीओला नेटकऱ्यांकडूनही चांगलाच प्रतिसाद मिळत असतो. अशातच आजच्या दिवाळी पाडव्यानिमित्त धनंजय पोवार यांनी सपत्नीक ‘इट्स मज्जा’बरोबर खास संवाद साधला. (Dhananjay Powar Love Story)
‘इट्स मज्जा’बरोबरच्या संवादात धनंजय यांच्या पत्नीने त्यांच्याशी लग्न करण्याचं नेमकं कारण सांगितलं. धनंजय यांचे अरेंज मॅरेज झाले असून या लग्नाचीही एक अनोखी कथा आहे. याबद्दल त्यांच्या पत्नीने सांगितले की, “मी यांना भेटायला गेली होती, तेव्हा त्यांना विचारलं होतं की, तुम्ही जसं तुमच्या आई-वडिलांना मान-सन्मान देता तसच माझ्या आई-वडिलांनाही द्याल का? कारण माझ्यासाठी माझे आई-वडील माझी प्राथमिकता आहेत. नंतर आमच्यात पत्रव्यवहार झाले तेव्हा मी त्यांना सांगितले की, मी तुमच्या आई-वडिलांचा माझे आई-वडील म्हणून जसा विचार करेन तसाच विचार तुम्हीही माझ्या आई-वडिलांबद्दल करावा”.
यापुढे धनंजय यांनी असं म्हटलं की, “बायकोच्या या उत्तरावरच मी तिला पसंत केलं होतं. मी बघितलेली ही पहिलीच मुलगी आहे. आमचा प्रेमविवाह नाही. अरेंज मॅरेज लग्न आहे. ०७ मार्च रोजी एका मुहूर्तावर वडिलांनी मुलगी बघायला जायचे आहे असं सांगत मला घेऊन गेले. तेव्हा आम्ही दोघांनीही एकमेकांना पहिलं नव्हतं. त्यामुळे मी वडिलांना म्हणालो की, मला त्या मुलीला पुन्हा पहायचे आहे. तेव्हा मी काही प्रश्न विचारले नाहीत. पण हिने अनेक प्रश्न विचारले. तेव्हा तिने मला तुम्ही तुमच्या आई-वडिलांचं जितका आदर करत आहात, तितकाच आदर माझ्या आई-वडिलांचा करणार का?” हा प्रश्न विचारला आणि तिच्या याच प्रश्नावर मी लग्न करण्याचा निर्णय घेतला”.
आणखी वाचा – ‘चार दिवस सासू’मुळे जुळलं, खेकडा देऊन प्रपोज, १७ वर्षांचा संसार अन्…; श्वेता शिंदेंची हटके लव्हस्टोरी
दरम्यान, धनंजय पवारच्या पत्नीचं नाव कल्याणी असे आहे. धनंजय व कल्याणी यांना दोन गोड मुलं आहेत. कल्याणीचा साड्यांचा व्यवसाय आहे. ‘आईसाहेब वस्त्रम’ असे कल्याणीच्या साड्यांच्या ब्रॅण्डचं नाव आहे. कल्याणी सोशल मीडियावर खूप सक्रिय असून चाहत्यांबरोबर ती अनेक रील व्हिडीओ शेअर करत असते.