कॉमेडी विश्वात कपिल शर्मा सध्या अग्रेसर आहे. ‘कॉमेडी नाईट्स विथ कपिल शर्मा’मधून त्याने अनेक वर्ष प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. यानंतर तो नेटफ्लिक्सवर ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’ घेऊन आला. नेटफ्लिक्समुळे आता तो जगभरात पोहोचला आहे. ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’चा पहिला सिझन हा १३ एपिसोडनंतर संपला होता. पहिला सिझन संपल्यानंतर चाहते नाराज झाले होते. या कॉमेडी शोचा दुसरा सीझन कधी येणार याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली होती. नुकताच या शोचा दूसरा सीझनही चाहत्यांच्या भेटीला आला. विनोदी स्किट्समुळे चर्चेत असणारा हा शो नुकताच एका वादामुळे चर्चेत आला आहे.
‘द ग्रेट इंडियन कपिल शो’च्या निर्मात्यांवर प्रसिद्ध बंगाली कवी आणि गीतकार श्रीजातो यांनी आरोप केले आहेत. सृजतो यांनी ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’च्या निर्मात्यांविरोधात गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली असून हे प्रकरण रवींद्रनाथ टागोरांच्या ‘एकला चोलो रे’ या रचनेशी संबंधित आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या कपिल शर्माच्या एपिसोडमध्ये क्रिती सेनन, काजोल आणि शाहीर शेख त्यांच्या ‘दो पत्ती’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आले होते. कृष्णा अभिषेकने एपिसोडमध्ये एक स्किट सादर केलं ज्यामुळे बंगाली समुदायातील लोक संतापले आहेत.
आणखी वाचा – ‘चार दिवस सासू’मुळे जुळलं, खेकडा देऊन प्रपोज, १७ वर्षांचा संसार अन्…; श्वेता शिंदेंची हटके लव्हस्टोरी
कृष्णा अभिषेकने रवींद्रनाथ टागोरांच्या ‘एकला चलो रे’ या गाण्याची खिल्ली उडवली आणि अपमान केल्याचं त्यांचं म्हणणं आहे. कवी सृजतोने सोशल मीडियावर एका पोस्टमध्ये दावा केला आहे की कृष्णा अभिषेकने एका सुंदर गाण्याची खिल्ली उडवून मर्यादा ओलांडली आहे. ‘ईटाईम्स’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी निर्मात्यांनी माफी मागावी अशी मागणी केली आहे. तसंच त्या एपिसोडची क्लिप ७ दिवसांच्या आत पुन्हा एडिट करावी असं सांगितलं आहे. तसं न केल्यास निर्मात्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असंदेखील म्हटलं आहे.
काजोल बंगाली असल्याने निर्मात्यांनी बंगालशी संबंधित एक स्किट तयार केले. कृष्णा अभिषेकने ‘एकला चलो रे’ गाण्यावर स्किट केले. याबाबत सृजतो म्हणाला की, “हे अजिबात मजेशीर नाही. ते अचानक तयार झाले नव्हते, तर पटकथेत तयार झाले होते. मी जास्त तपशिलात जाणार नाही, पण गाण्याबद्दल कृष्णाचे अभिव्यक्ती आणि टिप्पण्या असभ्य आणि अपमानास्पद होत्या”.