Tula Japanar Ahe : झी मराठी वाहिनीवर एकामागून एक नव्या मालिकांची घोषणा होताना दिसत आहे. या नवीन मालिकांमुळे जुन्या मालिकेच्या प्रसारणाच्या वेळेत मोठे बदल केले जात आहेत तर काही मालिकांना प्रेक्षकांचा निरोप घ्यावा लागत आहे. नुकतेच ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेच्या निरोपाची घोषणा करण्यात आली. या मालिकेच्या शेवटच्या भागाचे चित्रीकरण पूर्ण करण्यात झाले. वाहिनीवर २३ डिसेंबर पासून ‘लक्ष्मी निवास’ ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अशातच आता आणखी एक मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे आणि ही मालिका म्हणजे ‘तुला जपणार आहे’. (Tula Japanar Ahe new promo)
‘तुला जपणार आहे’ या आगामी नवीन मालिकेची कथा आई आणि मुलीच्या नात्याभोवती गुंफलेली आहे. या मालिकेत मुख्य भूमिका अभिनेत्री प्रतीक्षा शिवणकर साकारणार आहे. ‘तुला जपणार आहे’ या मालिकेचा पहिला प्रोमो नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. प्रोमोच्या सुरुवातीला अंधाऱ्या रात्री एका बंगल्यात आई आपल्या मुलीसाठी अंगाई गात असल्याचं पाहायला मिळतं. यानंतर लेक लहान असताना तिला कसं खेळवण्यात आलं होतं याचे प्रसंग दिसतात. पण, यानंतर जी आई मुलीला खेळवतेय तिचं आधीच निधन झालेलं आहे, असं प्रोमोमध्ये पाहायला मिळतं आहे.
आणखी वाचा – “बैलाने उचलून मला फेकलं आणि…”, रेश्मा शिंदेने सांगितला ‘तो’ प्रसंग, म्हणाली, “त्याने शिंगाने…”
मालिकेच्या या नवीन प्रोमोला चाहत्यांसह अनेक कलाकारांनीही पसंती दर्शवली आहे. सुयश टिळक, अभिजीत खांडकेकर, शशांक केतकर, रश्मी अनपट, अक्षया नाईक, ऐश्वर्या शेट्ये, ऋचा गायकवाड, शर्वरी जोग अशा अनेकांनी कमेंट्स करत मालिकेतील अभिनेत्री प्रतीक्षा शिवणकरचं कौतुक व तिला शुभेच्छा दिल्या आहेत. त्याचबरोबर अनेकांनी या नवीन मालिकेसाठी उत्सुकताही व्यक्त केली आहे. लवकरच वाहिनीकडून या मालिकेच्या शुभारंभाची तारीख अन् वेळ जाहीर करण्यात येईल.
आणखी वाचा – आधी भांडण, मतभेद आता सासूबाईंकडून अंकिता लोखंडेचं तोंडभरुन कौतुक, म्हणाल्या, “आमच्या कुटुंबात येऊन…”
‘अंतरपाट’, ‘जीवाची होतीया काहिली’, ‘कॉलेज डायरी’ या मालिकेमधून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली अभिनेत्री प्रतीक्षा यात मुख्य भूमिकेत आहे. मालिकेत सहाय्यक ते मुख्य भूमिका साकारण्याचा तिचा हा प्रवास नक्कीच उल्लेखनीय आहे. त्यामुळे आता प्रतीक्षाच्या या नव्या मालिकेकडून प्रेक्षकांच्या मनातदेखील उत्सुकता आहे. आता या मालिकेची कथा नेमकी काय असेल?, यामध्ये अन्य कोणते कलाकार झळकणार? याची नावं अद्याप समोर आलेल नाहीत.