टेलिव्हिजनवरील गाजलेली मालिका ‘शक्तीमान’मधील मुख्य भूमिका साकारणारे मुकेश खन्ना खूप चर्चेत असलेले बघायला मिळत आहेत. काही दिवसांपूर्वीच त्यांनी सोनाक्षी सिन्हावर निशाणा साधला होता. ‘कौन बनेगा करोडपती’ या कार्यक्रमादरम्यान रामायणासंदर्भात योग्य उत्तर देता न आल्याने अभिनेत्रीने खोचक टिप्पणी केली आहे. त्यांच्या या टिप्पणीवर सोनाक्षी व तिचे वडील शत्रुघ्न सिन्हा यांनी मुकेश यांना सडेतोड उत्तर दिले आहे. सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात याबद्दलची चर्चा रंगली होती. अशातच आता पुन्हा एकदा मुकेश चर्चेत आले आहेत. त्यांनी आता अभिनेता रणबीर कपूरवर निशाणा साधला आहे. ते नक्की रणबीरबद्दल काय म्हणाले? हे आपण आता जाणून घेऊया. (mukesh khanna on ranbir kapoor)
मुकेश यांनी रणबीरचा आगामी चित्रपट ‘रामायण’वर भाष्य केले आहे. त्यामुळे एक नवीन वाद निर्माण झाला आहे. मुकेश यांनी ‘मिड डे’बरोबर संवाद साधला आहे. यावेळी त्यांना नितेश तिवारी यांच्या ‘रामायण’ चित्रपटातील भगवान श्रीरामांच्या कास्टिंगबद्दल प्रश्न विचारला. त्यावर ते म्हणाले की, “मी याबद्दल काहीही बोलणार नाही. जर मी काही बोललो तर मी प्रत्येक गोष्टीवर भाष्य करतो असे आरोप करतील. त्यांनी माझी प्रतिमा खराब केली आहे”.
पुढे ते म्हणाले की, “मी नुकतीच जॅकी श्रॉफच्या मुलाबद्दल भाष्य केले. मी असभ्य नाही पण मी माझ्या मनातलं बोलून जातो. जर ते रामायण बनवत असतील तर अरुण गोविल यांच्याशी केलेली तुलना चुकीची ठरेल”. नंतर त्यांना “रामाच्या भूमिकेसाठी कोणता अभिनेता योग्य आहे असं वाटतं?”, असं विचारण्यात आले. त्यावर त्यांनी उत्तर दिले की, “अरुण गोविल यांनी या भूमिकेला एका स्तरावर ठेवले आहे. मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की जो कोणी रामाची भूमिका साकारेल त्याने रामाचे रुप धारण करावे. रावणासारखा दिसू नये”.
पुढे ते म्हणाले की, “जर तो खऱ्या आयुष्यात एक गुंड असेल तर ते स्क्रीनवर दिसेल. जर तुम्ही रामाची भूमिका साकारणार असाल तर तुम्हाला पार्टी करण्याची आणि दारु पिण्याची परवानगी नाही. पण रामाची भूमिका कोण साकारणार हे सांगणारा मी कोण?”. याचवेळी त्यांनी आदिपुरुष या चित्रपटामध्ये प्रभासने रामाची भूमिका साकारण्यावर भाष्य केले आहे. ते म्हणाले की, “इतका मोठा स्टार असूनही प्रेक्षकांनी त्याला स्वीकारले नाही. याचा अर्थ तो चांगला अभिनेता नाही असं नाही”. पुढे ते म्हणाले की, “मात्र प्रभास रामासारखा दिसत नाही. आता रामाची भूमिका साकारणारा अभिनेता कपूर कुटुंबातील आहे. तो एक चांगला अभिनेता आहे. पण मी त्याच्याकडे बघितल्यावर तो रामासारखा दिसला पाहिजे”. रणबीरने ‘ॲनिमल’मध्ये साकारलेल्या भूमिकेचीही आठवण करुन दिली आहे.