मराठी मनोरंजन विश्वात टीव्हीवरील मालिकांचे एक वेगळेच महत्त्व आहे. घराघरातल्या प्रत्येक व्यक्तीला मालिका या त्यांच्या कुटुंबाचाच एक भाग वाटत असतात आणि जेव्हा या मालिका बंद होतात तेव्हा कलाकारांइतकंच प्रेक्षकांनाही वाईट वाटतं. अशातच छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका ‘तू चाल पुढं’ लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. येत्या १३ जानेवारी रोजी या मालिकेचा शेवटचा भाग प्रदर्शित होणार असल्याचे म्हटले जात आहे. अल्पावधीतच या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले होते. अल्पवधीतच मालिका व मालिकेतील कलाकार चाहत्यांच्या विशेष पसंतीस उतरले.
‘तू चाल पुढं’ मालिकेतील काही कलाकारांनी त्यांचे सेटवरील शेवटचे व्हिडिओ व फोटो चाहत्यांबरोबर शेअर केले. अभिनेत्री धनश्री काडगावकरने काही दिवसांपूर्वी एक पोस्ट शेअर केली होती. नुकतीच अभिनेता आदित्य वैद्यनेदेखील एक भावुक व्हिडीओ शेअर केला आहे आणि यानंतर आता अभिनेत्री दीपा परबनेदेखील तिचा एक भावुक व्हिडीओ शेअर केला आहे. यात तिने तिच्याबरोबर एक खास वस्तूदेखील आठवण म्हणून नेली असल्याचे या व्हिडीओमध्ये दिसत आहे.
दीपाने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये, अश्विनी तिच्या नव्या घरात प्रवेश करत आहे. तर मालिकेचे दिग्दर्शक शेवटचा कट म्हणत सगळ्यांना निरोप देत आहेत. यानंतर सगळेच कलाकार भावुक होत एकमेकांना निरोप देत आहेत. यानंतर दिपा सेटवरील सगळ्यांची भेट घेते आणि त्याचबरोबर सर्वांच्या पायादेखील पडते. यानंतर ती सेटवरील एक गोष्ट आपल्याबरोबर घेऊन जाते. ही गोष्ट आहे अश्विनीचा लाडका गणू. “अश्विनीची नवीन घराची स्वप्नपूर्ती आणि दीपाचा यापुढील प्रवास या दोन्हीचा साक्षीदार राहील हा गणू!” असं म्हणत ती आठवण म्हणून त्याला आपल्याबरोबर घेऊन गेली आहे.
दरम्यान, या भावुक व्हिडीओवर चाहत्यांनीदेखील कमेंट्स करत मालिका संपत असल्यावर दु:ख व नाराजी व्यक्त केली आहे. या व्हिडीओखाली एकाने कमेंट करत असे म्हटले आहे की, “मालिका संपते तेव्हा आम्हा प्रेक्षक वर्गाला पण कुठे तरी वाईट वाटते. आम्ही कलाकारांना आपल्या घरातील सदस्य मानत असतो. तुम्ही व तुमची मालिका कायम स्मरणात राहील. तर आणखी एकाने असे म्हटले आहे की, “मालिकेची संकल्पना खूपच छान होती. खूप आवडती मालिका निरोप घेत आहे. याचं दु:ख वाटतं आहे.” अशा अनेक कमेंट्सद्वारे मालिकेच्या चाहत्यांनी यावर दु:ख व्यक्त केले आहे.