बॉलिवूडचा किंगखान म्हणून प्रसिद्ध असलेला अभिनेता म्हणजे शाहरुख खान. आपल्या अभिनयाच्या जोरावर शाहरुखने प्रेक्षकांच्या मनात त्याचं एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. शाहरुखने त्याच्या अभिनय, नृत्य या कौशल्यासह त्याच्या वागण्या-बोलण्यामुळेदेखील जगभारत असंख्य चाहते तयार केले आहेत. अभिनयाबरोबर शाहरुख त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही अनेकदा चर्चेत आला आहे. २०२१ मध्ये शाहरुखचा मुलगा आर्यन खानला ड्रग्स केस प्रकरणी अटक करण्यात आली होती. नुकत्याच एका मुलाखतीत शाहरुखने पहिल्यांदा आर्यन खान अटक प्रकरणी त्याची प्रतिक्रिया दिली आहे. (Shah Rukh Khan On Aryna Khan Drugs Case)
२०२१ मध्ये आर्यन खानला ड्रग्स केस प्रकरणी अटक करण्यात करण्यात आली होती. या घटनेनंतर शाहरुखवर अनेक स्तरातून टीकाही झाली होती. तसेच त्याला मोठ्या प्रमाणात ट्रोलिंगचाही सामना करावा लागला होता. मात्र, या संपूर्ण प्रकरणावर स्वत: शाहरुख किंवा त्याच्या संबंधित कुणीही त्यावेळी प्रतिक्रिया दिली नव्हती. अशातच शाहरुखला नुकतेच न्यूज १८’ कडून एका पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तेव्हा या कार्यक्रमात शाहरुखने लेकाच्या ड्रग्स प्रकरणाबाबत पहिल्यांदाच भाष्य केले आहे.
यावेळी शाहरुख असं म्हणाला की, “गेली ४-५ वर्षे माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबासाठी थोडी कठीण गेली आहेत. माझे बहुतेक चित्रपट फ्लॉप झाले. विश्लेषकांनी माझ्या कारकिर्दीबद्दल वाईट लिहायला सुरुवात केली. यानंतर त्यांनी वैयक्तिक पातळीवर येणाऱ्या समस्या मांडल्या. त्यानंतर अनेकांना शाहरुख खान संपला, असं वाटू लागलं होतं.”
यापुढे शाहरुखने असे म्हटले की, “वैयक्तिक स्तरावरही माझ्या आयुष्यात काही त्रासदायक गोष्टी घडल्या आहेत; ज्यातून मी खूप काही शिकलो आहे. मला असं वाटतं, की जेव्हा परिस्थिती अवघड असते तेव्हा माणसाने शांत राहिलं पाहिजे आणि स्वतःची प्रतिष्ठा जपत काम करीत राहिलं पाहिजे. कारण जेव्हा तुमच्या आयुष्यात सगळं चांगलं सुरू आहे, असं तुम्हाला वाटत असतं. तेव्हा अचानक तुम्ही जोरात जमिनीवर आपटले जाता आणि तुम्हाला कळतही नाही.”
दरम्यान, २ ऑक्टोबर २०२१ रोजी आर्यन खानला मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या कॉर्डिलिया या क्रूझवर ड्रग्स प्रकरणी अटक करण्यात आली होती. त्यानंतर २९ ऑक्टोबर २०२१ पर्यंत आर्यन आर्थर रोड तुरुंगात होता. नंतर आर्यनला २५ दिवसांनी जामीन मिळाला होता.