बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता टायगर श्रॉफ व अभिनेत्री क्रिती सेनन यांचा बहुचर्चित चित्रपट ‘गणपत’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यापूर्वी ही जोडी ‘हिरोपंती’ या चित्रपटात एकत्र दिसली होती. मात्र आता हे दोघं या धमाकेदार चित्रपटात पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. ‘गणपत’ चित्रपटाची घोषणा झाल्यापासून हा चित्रपट बराच चर्चेत होता. मात्र चित्रपटाचा टिझर प्रदर्शित झाल्यापासून चाहत्यांमध्ये उत्सुकता आणखीनच वाढवली होती. आता नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. काही मिनिटातच या ट्रेलरला लाखो व्ह्युज मिळाले आहे. नेटकऱ्यांनाही हा ट्रेलर बराच आवडताना दिसत आहे. (ganpath official hindi trailer release)
ट्रेलरची सुरुवात टायगर श्रॉफच्या आवाजातील डायलॉगने होते. ‘एक दिन एक ऐसा योद्धा पैदा होगा जो अमर होगा, वो अमीरों और गरीबों के बीच की दीवार गिराएगा… वो योद्धा मरेगा नहीं मारेगा’, असं म्हणत टायगरची एण्ट्री होते. बॉलिवूडच्या इतर कथांप्रमाणे या चित्रपटातही प्रेमकथा दाखवण्यात आली आहे. त्याबरोबर जबरदस्त अॅक्शनचा धमाका यात पाहायला मिळणार आहे. अमिताभ बच्चन एका वेगळ्या किरदारात दिसत आहेत. मात्र त्यांच्या या चित्रपटातील भूमिकेबाबत ट्रेलरवरून अंदाज लावणं कठीण आहे. क्रिती सुद्धा चित्रपटात सूपर अॅक्शन अवतारात दिसत आहे.
‘गणपत’ चित्रपटाचा ट्रेलर एका वेगळ्या, नवीन जगापासून सुरु होतो. ज्यात भविष्यात २०७० सालचं काल्पनिक स्वरूपात मांडलं आहे. ज्यावेळी गरीब व श्रीमंत लोकांच्या परिस्थितीत बरंच अंतर दाखवण्यात आलं आहे. या काळात एक सैतान गरीबांना त्रास देत आहे. ज्याच्यासाठी फक्त पैसा महत्त्वाचा आहे. त्यांनंतर यात टायगर श्रॉफच्या गुड्डू या पात्रापासून गणपत होण्यापर्यंतचा प्रवास दाखवण्यात आला आहे. चित्रपटात ग्राफिक्स व व्हीएफएक्सचा वापर करण्यात आला आहे. या चित्रपटातील टायगरच्या अॅक्शन अवतारामुळे त्याच्या जुन्या चित्रपटांची आठवण झाली असेल. मात्र ‘वॉर’, ‘बागी’, ‘हिरोपंती’ या चित्रपटांपेक्षा या चित्रपटात टायगर नव्या आणि हटके अवतारात पाहायला मिळणार आहे.
या चित्रपटाचं दिग्दर्शन विकास बहल यांनी केलं आहे. तर या चित्रपटाचे निर्माता वाशू भगनानी, विकास बहल, दीपशिखा देशमुख व जॅक भगनानी हे आहेत. दसऱ्याच्या मुहुर्तवर हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. २० ऑक्टोबर २०२३ या तारखेला चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट हिंदी, तेलुगू, तामिळ आणि मल्याळम भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.