मराठी मनोरंजनसृष्टीत आतापर्यंत अनेक थोर व्यक्तींच्या जीवनावर आधारित चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आले. अशातच, साने गुरुजी यांच्या कादंबरीवर आधारित ‘श्यामची आई’ चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. दोन वर्षांपूर्वी जेव्हा या चित्रपटाची घोषणा करण्यात आली, तेव्हापासून चित्रपटप्रेमी या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचं पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं. त्यानंतर आज या चित्रपटाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. त्याचबरोबर चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखदेखील यावेळी जाहीर करण्यात आली. (Shyamchi Aai Movie Teaser Out)
‘शाळा’, ‘फुंतरू’, ‘आजोबा’, ‘केसरी’ हे चित्रपट गाजल्यानंतर राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक सुजय डहाके ही ‘श्यामची आई’ चित्रपट घेऊन येत आहे. साने गुरुजी यांच्या प्रसिद्ध कादंबरीवर आधारित चित्रपटाचा टीझर समोर आला आहे. या टीझरमध्ये संपूर्ण साने कुटुंबीय त्यांचा एकत्र फोटो काढण्यासाठी एकत्र जमलेले दिसत आहे. प्रेक्षकांना ब्रिटीश राजवटीतील काळ या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. विशेष म्हणजे, या चित्रपटाचा टीझर संपूर्ण ‘ब्लॅक अँड व्हाइट’ स्वरूपात असून चित्रपटातील कलाकारांचे लूक्स, सेट, संवाद ते अगदी संगीत अशा साऱ्या गोष्टींना गोल्डन टच दिलेला जाणवत आहे. आता टीझर प्रदर्शित झाल्यामुळे प्रेक्षकांना या चित्रपटाविषयीची उत्सुकता वाढली आहे.
हे देखील वाचा – दमदार डायलॉग, धमाकेदार अॅक्शन आणि…; टायगर श्रॉफच्या बहुचर्चित ‘गणपत’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित, काही मिनिटांमध्येच लाखो व्ह्युज
साने गुरुजी यांच्या कादंबरीवर आधारित या चित्रपटात ओम भूतकर हे साने गुरुजींची मध्यवर्ती भूमिकेत दिसणार आहे. त्याबरोबरच गौरी देशपांडे, बाल कलाकार शर्व गाडगीळ, संदीप पाठक, ज्योती चांदेकर, सारंग साठ्ये, उर्मिला जगताप, अक्षया गुरव, दिशा काटकर, मयूर मोरे, गंधार जोशी, अनिकेत सागवेकर हे कलाकार यात महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.
हे देखील वाचा – Video : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या सेटवर दत्तू मोरेचा दांडिया डान्स, तर ओंकार राऊतचा गरबा पाहून तुम्हालाही हसू होईल अनावर
चित्रपटाची संहिता प्रसिद्ध लेखक-दिग्दर्शक सुनील सुकथनकर यांची आहे. तर चित्रपटाची निर्मिती अमृता अरुण राव यांची आहे. ‘पावनखिंड’ या गाजलेल्या चित्रपटाचे निर्माते भाऊसाहेब-अजय-अनिरुद्ध आरेकर, आकाश पेंढारकर आणि विक्रम धाकतोडे हे या चित्रपटाचे प्रस्तुतकर्ता आहेत. हा चित्रपट दिवाळीच्या शुभमुहूर्तावर १० नोव्हेंबर २०२३ रोजी संपूर्ण महाराष्ट्रभरात प्रदर्शित होणार आहे.