‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमामुळे प्रेक्षक अगदी खळखळून हसतात. महाराष्ट्रामधील प्रत्येक घरामध्ये हा कार्यक्रम आवडीने पाहिला जातो. अनेकदा नवनवीन विषय सिक्ट्सच्या माध्यमातून मांडले जातात. सध्या सगळीकडेच नवरात्रोत्सवाची जोरदार तयारी सुरु आहे. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मध्ये नवरात्रोत्सवाशी संबंधित नवनवीन स्किट प्रेक्षकांना पाहायला मिळतील. त्याचीच रंगीत तालिम म्हणून गरब्याची जोरदार प्रॅक्टिस या मंचावर सुरु आहे. याचेच काही व्हिडीओ आता समोर आले आहेत. (dattu more dandiya dance and onkar raut garaba dance video)
अनेकदा कलाकार रिल्स, सेटवरील धमाल सोशल मीडियावर शेअर करत असतात. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील मंडळीही यामध्ये काही कमी नाहीत. नुकतंच प्रियदर्शिनी इंदलकरने सेटवरील काही व्हिडीओ इन्स्टाग्रामद्वारे शेअर केले आहेत. तिने ओंकार राऊत, प्रियंका हांडे, दत्तू मोरे यांचे गरबा खेळतानाचे व्हिडीओ इंस्टाग्राम स्टोरीद्वारे पोस्ट केले. एका व्हिडिओमध्ये ओंकार गरब्याची जोरदार प्रॅक्टिस करताना दिसत आहे.
ओंकार एकटाच स्वतःच्या धुंदीत नाचत असल्याचे पाहायला मिळत आहे. हा व्हिडीओ पोस्ट करताना प्रियदर्शिनी म्हणते, ”ओंकार कोणत्या गरब्यामध्ये नाचत आहेस?”. तर दुसऱ्या व्हिडिओमध्ये दत्तू व प्रियांका दांडिया खेळताना दिसत आहेत. दोघेही दांडिया खेळण्यात गुंग झाले आहेत. दत्तू व प्रियांकाचा व्हिडीओ शेअर करत प्रियदर्शिनीने म्हटलं की, ”स्किट इंडस्ट्रीमधील उभरती जोडी”. एका स्किटसाठी कलाकारांची किती मेहनत असते? हे या व्हिडिओमधून दिसून येतं.
दत्तू, ओंकार, प्रियांकाच्या या व्हिडीओ चाहत्यांचीही पसंती मिळत आहे. त्याचबरोबरीने ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमात नवरात्र विशेष कोणत्या नव्या स्किट्स पाहायला मिळणार याची उत्सुकता प्रेक्षकांना लागून राहिली आहे. ओंकार , दत्तू, प्रियांका या कलाकारांचा डान्स सिक्ट्समध्ये पाहण्यासाठी प्रेक्षकवर्ग आणखीनच उत्सुक असणार एवढं नक्की.