Hardik Joshi Emotional : मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक अभिनेता म्हणून हार्दिक जोशीला ओळखले जाते. ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेतून अभिनेता चांगलाच लोकप्रिय झाला. या मालिकेतील राणा दा या भूमिकेने त्याला विशेष ओळख मिळवून दिली. वर्षभरापूर्वी हार्दिक जोशीवर दु:खाचा डोंगर कोसळला. हार्दिकच्या करिअरमध्ये त्याच्या वहिनीचा खूप मोठा वाटा आहे. हार्दिकच्या सुरुवातीच्या काळात त्याला त्याच्या वहिनीने बराच पाठिंबा दिला. यापूर्वीही हार्दिक अनेकदा वहिनीच्या आठवणींना उजाळा देताना दिसला आहे. यानंतर आता पुन्हा एकदा हार्दिकने त्याच्या आयुष्यातील या खास व्यक्तीबरोबर भाष्य केलं आहे.
‘कविरत स्टुडिओ’ला दिलेल्या मुलाखतीत हार्दिकने आपल्या वहिनीच्या आठवणी जाग्या केल्या आहेत. हार्दिक जोशी म्हणाला की, “वहिनी म्हणून ती जेव्हा माझ्या आयुष्यात तेव्हा माझ्याकडे काहीच काम नव्हतं. मी आज जे काही दिसतोय ते तिच्या मुळेच आहे. माझ्या या करिअरमध्ये मला सगळ्यात जास्त सपोर्ट घरातून माझ्या वहिनीने केला होता. जेव्हा मी स्ट्रगल करत होतो तेव्हा मला फारच कमी पैसे मिळायचे. तेव्हा मी छोटे-मोठे रोल्स करत होतो. सोबत नोकरीही शोधत होतो. त्यावेळी माझी वहिनी माझ्या सपोर्टसाठी उभी राहिली. तेव्हा तिने मला सांगितलं की, तू तुझं स्वप्न पूर्ण कर, तू स्ट्रगल कर तुला नाही करायचीये ना नोकरी मग नको करुस. आम्ही आहोत सपोर्टला. एक दिवस याच्यातच तुला यश मिळेल. माझ्या घरात ती नेहमीच मला पाठीशी घालायची. कधी कधी आईकडे पैसे मागायला लाज वाटायची तेव्हा ती मला गुपचूप पैसे द्यायची. ती कधी शॉपिंगला गेली की माझ्यासाठी कपडे आठवणीने घ्यायची. तिला माहित असायचं हार्दिकला हे खायला आवडायचं ते ती आणायची. माझ्यासाठी ती खूप मोठी सपोर्ट सिस्टीम होती”.
किस्सा सांगत तो पुढे म्हणाला, “‘जाऊ बाई गावात’ हा शो मी खरं तर सोडलाच होता. ज्या दिवशी प्रोमो आउट झाला त्या दिवशीच मला हॉस्पिटलमधून कळलं की वहिनी खूप सिरीयस आहे. तिचं केव्हाही काहीही होऊ शकतं. त्यावेळी माझ्या भावाबरोबर खंबीर उभे राहायच होतं. मी काम सोडायचं ठरवलं. झी मराठीच्या क्रिएटिव्हशी बोललो. ते मला सोडायला तयार नव्हते पण मला जायचं होतं. झी मराठीशी माझं वेगळं नातं आहे त्यामुळे ते लगेच पुण्यात आले त्यांनी वहिनीची परिस्थिती बघितली. पण मी हे काम करावं असं त्यांना वाटत होतं”.
आणखी वाचा – ‘अभंग तुकाराम’ चित्रपटाचा संगीत लोकार्पण सोहळा संपन्न, कलाकारही चित्रपटातील लूकमधून थेट मंचावर
शेवटी तो म्हणाला, “पण मी त्यांना सांगितलं की यावेळी मला घरी वेळ देणं आवश्यक वाटतंय. सात-आठ वर्ष कामानिमित्त घरी नीट वेळच दिला नव्हता. त्या अवस्थेत जेव्हा वहिनीला कळलं की मी शो सोडतोय तेव्हा तिने मला बोलावून घेतलं. तेव्हा ती बोलू शकत नव्हती. तिने ऑक्सिजन मास्क लावलेला. तरीही तिने मला विचारलं का सोडतोय? मी म्हटलं काही नाही, दादा सोबत राहण्यासाठी सोडतोय. तर तिने हाताच्या खुणेने मला हा शो सोडू नको असं सांगितलं आणि माझ्याकडून प्रॉमिस घेतलं. माझा शो आला तो यशस्वीही झाला पण तो बघायला ती नव्हती. मला ती नेहमी म्हणायची की तू कधीच माघार घेणारा नाही आहेस. याआधीच सर्व शो मालिका तिने पाहिल्या आहेत पण हा शो पाहायला ती नव्हती. इतकंच नाहीतर ती म्हणायची राणाची वहिनी म्हणून मला ओळखायचे तेव्हा तिला अभिमान वाटायचा”.





