टीआरपीच्या शर्यतीत प्रथम क्रमांक टिकवून ठेवणाऱ्या मालिकेचं नाव म्हणजे ‘ठरलं तर मग’. ही मालिका प्रदर्शित झाल्यापासून लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. या मालिकेतील पात्रांमुळे आणि त्यांच्या अभिनयामुळे ही मालिका अव्वल स्थान टिकवून आहे. मालिकेतील अर्जुन व सायलीवर तर प्रेक्षक भरभरुन प्रेम करताना दिसत आहेत. सायली हे पात्र अभिनेत्री जुई गडकरी साकारताना दिसते आहे. या मालिकेमुळे जुई लोकप्रियतेच्या शिखरावर आली. या मालिकेतील तिच्या पात्राला प्रेक्षक भरभरुन प्रतिसाद देताना पाहायला मिळत आहेत. (Jui Gadkari First Earning)
अभिनयाबरोबरच जुई सोशल मीडियावरही बऱ्यापैकी सक्रिय असते. सोशल मीडियावरुन काही ना काही शेअर करत ती नेहमीच चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. सोशल मीडियावरुन ती सेटवरील धमाल मस्ती, तसेच बीटीएस शेअर करत असते. अभिनेत्रीने नुकतंच सोशल मीडियावरुन ‘आस्क मी सेशन’ घेतलं होतं. यादरम्यान तिने नेटकऱ्यांच्या अनेक प्रश्नांची मनमोकळेपणाने उत्तर दिली. मात्र या सेशनमधील एका प्रश्नाने सर्वांचे लक्ष वेधले गेले. त्यात जुईला तिच्या पहिल्या कमाई बद्दल प्रश्न विचारला गेला होता.
पहिल्या कमाईबद्दल सांगताना जुई म्हणाली, “माझी पहिली कमाई आठशे रुपये होती. दुसरीत असताना मी शोमध्ये गायले होते. तेव्हा त्याचे आठशे रुपये मिळाले होते. आठशेपैकी पाचशे रुपये पैशाच्या स्वरुपात आणि उरलेल्या तीनशे रुपयांचं बक्षिस मिळालं होतं”. तसेच अभिनेत्रीच्या आणखी एका चाहत्याने “अभिनय क्षेत्रात काम करण्यापूर्वी तू फिरायला जाण्यासाठी पैसे कुठून जमा करायची?” असा प्रश्न विचारला यावर उत्तर देत जुई म्हणाली, “मी वयाच्या आठव्या वर्षापासून काम करायला सुरुवात केली आहे. त्यामुळे अर्थात मी फिरायला वगैरे आधीपासून पैसे साठवले होते” असं ती म्हणाली.

जुई गडकरीच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास स्टार प्रवाहवरील ‘पुढचं पाऊल’ मालिकेमुळे अभिनेत्रीचं नशीब बदललं. यामध्ये जुईने साकारलेल्या कल्याणी पात्राला प्रेक्षकांनी भरभरुन प्रतिसाद दिला. त्यानंतर ती ‘वर्तुळ’, ‘श्रीमंत पेशवा बाजीराव मस्तानी’, ‘सरस्वती’ या मालिकेतही दिसली. यानंतर ‘बिग बॉस मराठी’मुळे ती पुन्हा चर्चेत आली होती.