‘होणार सून मी या घरची’ मालिकेतून अभिनेत्री तेजश्री प्रधान हिने प्रेक्षकांच्या मनात घर केलं. या मालिकेमुळे अभिनेत्रीला खऱ्या अर्थाने ओळख मिळाली. त्यानंतर तेजश्रीने अनेक मराठी मालिका, चित्रपटांमधून काम केलं. सध्या तेजश्री ‘प्रेमाची गोष्ट’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. अभिनेत्री नेहमीच तिच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून सक्रिय असते. नेहमीच ती काही ना काही पोस्ट करत अनेक मुद्द्यांवर स्पष्टपणे भाष्य करते. बरेचदा अभिनेत्री ट्रोलर्सच्या कचाट्यात अडकलेलीही पाहायला मिळाली. मात्र या ट्रोलर्सला उत्तरही तिने दिलेलं पाहायला मिळालं. (Tejashri Pradhan On Trolling)
अशातच तेजश्रीने तिच्या एका वक्तव्यामुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. तेजश्रीने नुकतीच ‘मिरची मराठी’ या रेडिओ चॅनेलला मुलाखत दिली होती. या मुलाखतीत बोलताना तिने ट्रोलर्सबद्दल वक्तव्य केलं आहे. याचबरोबर तिने ट्रोलर्सना उत्तरही दिलं आहे. अभिनेत्रीने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत तिच्या आईच्या निधनाबाबत व त्या दिवसांबाबत पहिल्यांदा भाष्य केलेलं ही पाहायला मिळालं.
तेजश्री म्हणाली, “मी बघतच नाही. एवढं सोपं आहे ते. सोशल नेटवर्किंग साईट्सवर तुम्ही जे रिऍक्ट करता त्या वागण्यातून, त्या लिहिण्यातून आम्ही कसे आहोत हे तुम्ही नाही दाखवत तर तुम्ही कसे आहात हे दाखवता. ते तुमच्या आतून येणार आहे त्यामुळे तुम्ही स्वतःला रेप्रेझेन्ट करता. त्यामुळे तुम्हाला आमच्याबद्दल बोलायचं असेल तर बोला. आम्ही ते बघतही नाही आहोत, आम्ही ते पाहतही नाही आहोत” असंही ती म्हणाली.
तेजश्री पुढे म्हणाली, “जेव्हा आमच्यासाठी तुम्ही लिहिता तेव्हा त्याच सोशल मीडियावर तुमच्या सर्कलमधली लोकसुद्धा असतात. तुम्ही काय लिहिलं आहे हे वाचतात. तुम्ही कुणासाठी लिहिलं यापेक्षा तुम्ही काय लिहिलं, तुमच्या तोंडून हे शब्द बाहेर पडलेत हे त्यांना कळतं. तुमचे विचार करण्याची पद्धत काय आहे हे त्यांना कळतं. त्यामुळे स्वतःला छान रेप्रेझेन्ट करा. तुमच्याच आजूबाजूची लोकं तुम्हाला पाहत आहेत हे लक्षात ठेवा. बघा जमेल. हे एवढंही कठीण नाही आहे” असं म्हणत तेजश्रीने ट्रोलर्सला सल्ला दिला आहे.