‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘ठरलं तर मग’ ही मालिका प्रदर्शित झाल्यापासून लोकप्रियेतच्या शिखरावर आहे. या मालिकेने टीआरपीच्या शर्यतीतही आपलं अव्वल स्थान टिकवून ठेवलं आहे. या मालिकेतील सायली व अर्जुनच्या जोडीला तर प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर उचलून धरलं आहे. अभिनेत्री जुई गडकरी हिच्या सायली या भूमिकेमुळे तिचा खूप मोठा चाहतावर्ग निर्माण झाला आहे. मालिकेशिवाय जुई सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. (Jui Gadkari On Wedding)
शूटिंगमधून वेळात वेळ काढून जुई सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. नेहमीच ती मालिकेतील बीटीएस, मालिकेदरम्यानची धमाल-मस्ती तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करत असते. अशातच अभिनेत्रीने तिच्या इन्स्टाग्रामवर ‘आस्क मी सेशन’ घेतलं. यामध्ये अभिनेत्रीला तिच्या चाहत्यांनी अनेक प्रश्न विचारले. दरम्यान एका नेटकऱ्याने “अर्जुनची खरी सायली तर आम्ही बघितली पण जुईच्या खऱ्या आयुष्यातील अर्जुन कोण आहे?” असा प्रश्न तिला विचारला.
नेटकऱ्याच्या प्रश्नाला उत्तर देत जुई म्हणाली, “कळेल कळेल हा लवकरच कळेल! तसंही मी लग्न कधी करणार? असे असंख्य प्रश्न मला विचारण्यात आले आहेत. काही बायका तर माझ्या लग्नासाठी फारच उत्साही आहेत. नवऱ्याचा फोटो दाखवायला लाजतेस का? असे असंख्य मेसेज मला येतात. पण, अहो लग्न तर होऊ द्या. लग्न झाल्यावर रोज नवऱ्याचे फोटो टाकेन मग बोलू नका किती फोटो टाकते ही नवऱ्याचे” असं गमतीशीर उत्तर जुईने दिलेलं पाहायला मिळत आहे.
याआधी देखील जुईला “तुला कशा पद्धतीचे लग्न हवे आहे आणि लग्नात कोणती गोष्ट हवी आहे?” असा प्रश्न ‘इट्स मज्जा’ या पोर्टलकडून विचारण्यात आला. याचे उत्तर देत जुई असं म्हणाली की, “मला अत्यंत पारंपरिक पद्धतीने लग्न करायचे आहे. साध्या आणि सोप्या पद्धतीने लग्न करणे पसंत आहे. मला उगाच अवाढव्य लग्न आवडत नाहीत. तसेच हल्ली लग्नाचे इव्हेंट केले जातात, हे मला आवडत नाही. कारण लग्न ही आपली खासगी गोष्ट असून या सोहळ्यात आपले कुटुंबीय, मित्रपरिवार व जवळच्या काही खास माणसांना बोलावून लग्न करायचे आहे.”