सध्या सगळीकडेच लग्नाचा माहोल सुरु आहे. अनेक कलाकार मंडळी आपल्या जोडीदारांबरोबर विवाहबंधनात अडकत आहेत. अशातच स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘प्रेमाची गोष्ट’ या मालिकेतदेखील मुक्ता-सागर यांच्या लग्नाची धामधूम पाहायला मिळत आहे. मुक्ता-सागर यांच्या लग्नाचे अनेक फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यांच्या या खास लग्नसोहळ्याला वाहिनीवरील विविध मालिकांमधील कलाकारांनीही हजेरी लावली. (Jui Gadkari Talk About Her Future Marriage And Husband)
मुक्ता-सागर यांच्या लग्नसोहळ्याला ‘ठरलं तर मग’ या मालिकेतील अर्जुन-सायली यांनीही खास हजेरी लावली. यावेळी ‘इट्स मज्जा’ने अर्जुन-सायली यांच्याबरोबर खास संवाद साधला. या संवादात सायली म्हणजेच अभिनेत्री जुई गडकरीने तिच्या लग्नाविषयीच्या अपेक्षा सांगितल्या आहेत. त्याचबरोबर या मुलाखतीत तिने तिच्या लग्नाची तारीखही जाहीर केली आहे. या मुलाखतीदरम्यान अर्जुन-सायली अर्थात जुई गडकरी व अमित भानुशाली यांच्यातली खास केमिस्ट्रीदेखील पाहायला मिळाली.
आणखी वाचा – अखेर रुपालीचं सत्य अव्दैतला कळणार?, ‘सातव्या मुलीची…” मालिकेत मोठा ट्विस्ट, प्रोमोने वाढवली उत्सुकता
यावेळी जुईला “तुला कशा पद्धतीचे लग्न हवे आहे आणि कोणती गोष्ट हवी आहे?” असा प्रश्न विचारण्यात आला. याचे उत्तर देत जुई असं म्हणाली की, “मला अत्यंत पारंपरिक पद्धतीने लग्न करायचे आहे. साध्या आणि सोप्या पद्धतीने लग्न करणे पसंत आहे. मला उगाच अवाढव्य लग्न आवडत नाहीत. तसेच हल्ली लग्नाचे इव्हेंट केले जातात, हे मला आवडत नाही. कारण लग्न ही आपली खासगी गोष्ट असून या सोहळ्यात आपले कुटुंबीय, मित्रपरिवार व जवळच्या काही खास माणसांना बोलावून लग्न करायचे आहे.”
तसेच यापुढे ती असं म्हणाली की, “मला पाठशाळा, गोशाळा, वृद्धाश्रम, अनाथाश्रम, महिलाश्रम तसेच निराधार व प्राण्यांसाठी काही देणगी द्यायची आहे आणि मग मला माझ्या लग्नाची पहिली पत्रिका द्यायची आहे.” तसेच या मुलाखतीत अमितने येत्या फेब्रुवारीमध्ये जुई लग्न करणार असल्याचाही खुलासा केला आहे. तसेच जुईला नेमका कसा नवरा हवा आहे? याबद्दलही मनमोकळेपणाने संवाद साधला.