tharala tar mag : ‘ठरलं तर मग’ मालिकेत एकामागोमाग एक ट्विस्ट येताना पाहायला मिळत आहेत. आजच्या भागात विलास खुनाचा निकाल हा लागलेला पाहायला मिळाला. अर्जुन सुभेदारने ही केस जिंकत मधुभाऊंना योग्य तो न्याय मिळवून दिला. त्यामुळे मधुभाऊ खूप खुश होते. आपण न केलेल्या गुन्ह्याची ते इतके दिवस शिक्षा भोगत होते आणि याला कारणीभूत फक्त प्रिया होती. साक्षीने विलासचा खून केल्यानंतर प्रियानेच पिस्तूलवर मधुभाऊंच्या हाताचे ठसे घेतले, आणि ही गोष्टी साक्षीने कोर्टासमोर बोलून दाखविली. अर्जुनने प्रियाची उलट तपासणी करत तिला सत्य बोलायला भाग पाडले. अखेर साक्षी व प्रियाच दोषी असल्याचं कोर्टानेही सांगितलं.
प्रियाची कबुली ऐकून रविराज आणि सुभेदार कुटुंबाला खूप मोठा धक्का बसला. जिच्यावर विश्वास ठेवला तिनंच विश्वासघात केला, अशी परिस्थिती सुभेदारांची झाली. पूर्णा आईचा तर संताप झालेला पाहायला मिळाला. अशातच आता सोशल मीडियावर ‘ठरलं तर मग’ मालिकेचा प्रोमो शेअर करण्यात आला आहे. त्यामध्ये सायलीनं प्रियाला चांगलाच इंगा दाखवला आहे. सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या प्रोमोमध्ये पोलीस प्रिया आणि साक्षीला अटक करुन घेऊन जात असतात. तर कोर्टाच्या बाहेर पूर्णा आजी, कल्पना, सायली आणि अस्मिता उभ्या असतात.
त्यावेळी प्रिया पूर्णा आजीची माफी मागायला येते तेवढ्यात पुर्णा आजी प्रियाच्या सणसणीत कानाखाली मारते आणि म्हणते, इतक्या भयंकर मुलीचा आमच्या घराशी काहीही संबंध नाही, घेऊन जा हिला”, असं त्या म्हणतात. पूर्णा आजीपाठोपाठ कल्पनाही पुढे येते आणि प्रियाला खडेबोल सुनावते, ती म्हणते, “आम्ही तुझ्यावर विश्वास ठेवला आणि त्याचं तू हे फळ दिलंस”, असं म्हणत ती तिच्या कानाखाली मारते. तेवढ्यात सायली येते. प्रिया सायलीला विनवणी करत म्हणते, “मला जेलमध्ये नाही जायचं. सायलीसुद्धा प्रियाच्या कानाखाली मारते आणि म्हणते आता सात वर्ष जेलमध्ये सडायचं प्रिया, ही तुझ्यासाठी योग्य शिक्षा असणार आहे”.
कोर्टात शेवटच्या हिअरिंगच्या दिवशी प्रियाचा नवरा अश्विन तिथं नसतो त्यामुळे आता बायकोला शिक्षा झाली हे कळल्यावर त्याची काय प्रतिक्रिया असेल. इकडे प्रतिमाला प्रियाचा प्रताप समजला की ती काय विचार करेल?, आणि आता तरी कल्पना आणि पूर्णा आजी सायलीचा स्वीकार करतील का? हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.





