‘ठरलं तर मग’ मालिकेत सध्या रंजक ट्विस्ट येताना पाहायला मिळत आहे. मालिकेत असं पाहायला मिळत आहे की, विलास गोळीबार केसप्रकरणात कोर्टात सुनावणी असते. अर्जुन साक्षीविरोधी पुरावे कोर्टात सादर करतो. हे पाहून साक्षीला घाम फुटतो. साक्षीविरोधी एक महत्त्वाचा पुरावा अर्जुन कोर्टात सादर करतो. अर्जुन कोर्टात शिवानी जाधवला आणतो. त्यावेळी साक्षीने पैसे देऊन तिला कोर्टात खोटी साक्ष दिली असल्याचं शिवानी कोर्टात सांगते. मात्र साक्षीचा वकील म्हणून चैतन्य खोटं नाटक करत सारखी साक्ष बदलणाऱ्या साक्षीदारांवर कसा विश्वास ठेवायचा असं म्हणत आता दिलेली साक्ष खरी असल्याचं सिद्ध करायला सांगतो. (Tharal tar mag Serial Update)
ही साक्ष सिद्ध करायला अर्जुन त्यांच्यातील हे संभाषण कोर्टात सादर करतो. यानंतर साक्षी, प्रिया आणि नागराज यांची अवस्था फार वाईट होते. सायलीला या व्हिडिओबद्दल माहीत नव्हते. अर्जुन कोर्टात सांगतो त्याला हा व्हिडीओ शिवानीनेच दिला. यावर शिवानी सांगते की, तिच्या मामाने तिला आधीच सांगितलं होतं की, साक्षी व महिपत खूप वाईट माणसं आहेत. महिपत तर कोणाचा जीवही घेऊ शकतो. आम्ही नंतर कोणत्याही गुन्ह्यात अडकायला नको म्हणून मामाने तिच्या मामेभावाला हा व्हिडीओ काढायला सांगितला असल्याचं शिवानी सांगते.
अर्जुन साक्षीला प्रश्न विचारायला विटनेस बॉक्समध्ये बोलावतो आणि विचारतो की, तुला या व्हिडीओबद्दल काही बोलायचं आहे का?, यावर साक्षी रागाने फक्त पाहत राहते आणि काहीच बोलत नाही. तेव्हा अर्जुन कोर्टाला विनंती करतो की, कोर्टात खोटं बोलल्याप्रकरणी आणि पैसे देऊन खोटे पुरावे उभे केले म्हणून तसेच कोर्टाची फसवणूक केली म्हणून मिस साक्षी यांना जास्तीत जास्त शिक्षा व्हायला हवी. तसेच विलास केसप्रकरणावेळी साक्षी तिथे उपस्थित नसल्याचं सिद्ध करण्यासाठी तिने हा डाव आखला म्हणून विलासचा खून साक्षीने केला असावा हे नाकारता येत नाही”, असंही म्हणतो.
शिवानीने खोटी साक्षी दिल्याने तिला १० हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात येतो. तर साक्षीला खोटे पुरावे उभे करणे, कोर्टाची फसवणूक करणे आणि लाच देणे या आरोपांसाठी दोषी मानले जाते. याप्रकरणी तिला ५० हजारांचा दंड ठोठावला जातो. आणि त्यावेळी साक्षी नेमकी कुठे होती याचा पाठपुरावा करण्यात यावा असंही सांगितलं जात. खोटं बोलल्यामुळे चैतन्य साक्षीवर रागवायचं नाटक करतो. तर साक्षी चैतन्यकडे प्रेमाची कबुली देत त्याला प्रेमाच्या जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न करते. तर इकडे सायली व अर्जुन आनंद साजरा करत असतात.