‘ठरलं तर मग’ ही मालिका सध्या प्रेक्षकांच्या आवडत्या मालिकेपैकी एक आहे. टीआरपीच्या शर्यतीत ही मालिका अव्वल स्थानावर असलेली पाहायला मिळत आहे. मालिकेत काही दिवसांपासून नवनवीन ट्विस्ट येताना पाहायला मिळत आहेत. मालिकेत आलेल्या टर्न आणि ट्विस्टमुळे ही मालिका साऱ्यांच्या पसंतीस पडत आहे. सध्या मालिकेत प्रिया व अर्जुन यांचा रोमँटिक अंदाज पाहायला मिळत आहे. मधुभाऊंची सुखरुप सुटका करण्यासाठी अर्जुन प्रियाबरोबर खोटं प्रेमाचं नाटक करत आहे. अर्जुनच्या या नव्या डावात प्रिया चांगलीच अडकलेली असते. मात्र तिला याची जराही खबर नसते. (Tharal Tar Mag Promo)
तर अर्जुन प्रियासह खोटं नाटक करत आहे याबाबत सायलीला पूर्ण कल्पना असते. तरी सुद्धा अर्जुन व प्रियाला एकत्र पाहून सायलीचा राग अनावर होतो. रेस्टॉरंटमध्ये प्रिया व अर्जुनला एकत्र डान्स करताना पाहून सायली प्रचंड संतापते आणि तिथून निघून जाते. अर्जुन सायलीला खूप समजावण्याचा प्रयत्न करतो मात्र ती काहीच ऐकून घेत नाही. त्यावेळी सायलीसमोर खूप मोठा अपघात होणार असतो तेव्हा सायली त्या अपघातातून एका बाईला वाचवते. ती बाई प्रतिमा असते.
सायली त्या बाईला चेहऱ्यावर जखमा व ओढणी ओढल्याने ओळखू शकत नाही. आणि प्रतिमाही सायलीला पाहून निघून जाते. सायली घरी येऊन प्रतिमाच्या फोटोवर स्केचपेनने जखमा रेखाटते, पांढऱ्या ओढणीने प्रतिमाचा अर्धा चेहरा झाकते. यानंतर रस्त्यात दिसलेली बाई आणि प्रतिमा आत्या एकच असल्याची खात्री सायलीला होते. अर्जुनला ती या सगळ्याची कल्पना देते पण, तो काही केल्या ऐकत नाही.
आणखी वाचा – हरीशच्या जाण्याचं सत्य समोर येणार का?, दिशा-दामिनी पारूचा खरा चेहरा सर्वांसमोर आणणार का?
मालिकेच्या नव्या प्रोमोमध्ये असे पाहायला मिळत आहे की, सुभेदार कुटुंब सायलीची वाट पाहत असतात. तेव्हा सायली प्रतिमाला घेऊन घरी येते. प्रतिमा अनेक वर्षांनी सुभेदारांच्या घरी आल्याने सारे नि:शब्द होतात. अर्जुन त्याच्या आत्याला पाहून थक्क होतो. तर, पूर्णा आजीला आपल्या लेकीला पाहून अश्रू अनावर होतात. प्रतिमा असा आवाज देत त्या रडू लागतात. तर प्रतिमा सगळ्यांकडे पाहत उभी असते. आता प्रतिमाच्या येण्याने मालिकेत पुढे काय होणार हे पाहणं रंजक ठरेल.