कोणत्याही कलाकाराच्या आयुष्यात एक अशी वेळ नक्कीच येते जिथे तो कलाकार त्याच्या भूमिकेने व अभिनयाने सर्वांना अचंबित करतो. प्रत्येक कलाकार त्याच्या कारकीर्दीत अशा एका भूमिकेच्या शोधात असतो जी भूमिका त्याच्या करिअरला वेगळीच कलाटणी देते. असाच आयुष्याला कलाटणी देणारा अनुभवन अभिनेता क्षितीश दातेने अनुभवला. क्षितीशने ‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ या चित्रपटात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भूमिका केली असून ही भूमिका त्याच्या वाखणण्याजोगी होती. धर्मवीर चित्रपटातील त्याच्या या भूमिकेचे खूपच कौतुक झाले. ‘धर्मवीर’च्या प्रचंड यशानंतर आता या चित्रपटाचा दूसरा भागही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
गुरुपौर्णिमेच्या पूर्वसंध्येला ‘धर्मवीर २’ या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला. गेले अनेक दिवस या चित्रपटाची चर्चा सुरु आहे. अशातच ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून यामधील काही संवादांनी विशेष लक्ष वेधून घेतलं आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडाचं कारण, आनंद दिघे यांचा मृत्यू कसा झाला असे अनेक प्रश्न उपस्थित करणारे संवाद या ट्रेलरमध्ये आहेत. त्यामुळे आता अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत. अशातच क्षितीश दातेने चित्रपटाबद्दल काही गोष्टी सांगितल्या आहेत.
‘धर्मवीर-२’ चित्रपटाच्या ट्रेलर लॉंचला क्षितीश दातेने ‘इट्स मज्जा’बरोबर साधलेल्या संवादात चित्रपटाविषयी काही गोष्टींचा उलगडा केला. यावेळी क्षितीशला त्याने चित्रपटात मुख्यमंत्र्यांची भूमिका केली असल्यामुळे यादरम्यान त्यांनी काही टिप्स किंवा सल्ले दिले का? असा प्रश्न विचारण्यात आला. याचे उत्तर देत क्षितीशने असं म्हटलं की, “त्यांचा (मुख्यमंत्री एकनाथ शिंदे) या सिनेमात काहीच हस्तक्षेप नाही. पूर्ण मुभा आहे आम्हाला. त्यांचं पात्र असल्यामुळे ते कटाक्षाने पाहत असतील. पण त्यांचे सल्ले किंवा हे करा, ते करा असं काहीच नसतं”.
आणखी वाचा – Video: पूजा सावंतचा ‘कलरफूल’ अंदाज, परदेशात नवऱ्याबरोबर रोमॅंटिक डान्स, व्हिडीओ पाहून चाहते म्हणाले…
दरम्यान, ‘धर्मवीर’ चित्रपटाच्या पहिल्या भागाने बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली. या चित्रपटाने ५० कोटींची कमाई केल्याची चर्चा होती. त्यानंतर आता, ‘धर्मवीर-२’ हा चित्रपट १०० कोटी कमावणार असल्याची चर्चा रंगली आहे. ‘धर्मवीर’च्या पहिल्या भागाच्या यशानंतर आता ‘धर्मवीर-२’च्या बॉक्स ऑफिसवरील कमाईकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. आता ट्रेलर लाँच झाल्यानंतर चित्रपटाविषयीची उत्सुकता अधिकच वाढल्याचे चित्र आहे.