टेलिव्हीजनवरील लोकप्रिय मालिका ‘शक्तिमान’ नेहमी चर्चेत असलेली पाहायला मिळते. आता या मालिकेचा आता चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटामध्ये अभिनेता रणवीर सिंह सकारणार असल्याच्या चर्चादेखील सुरु आहेत. मात्र मुकेश यांनी रणवीरच्या भूमिकेला विरोध दर्शवला होता. सोशल मीडियावरदेखील त्यांनी याबद्दल नाराजी व्यक्त केली होती. तसेच त्यांनी रणवीरच नाही तर अक्षय कुमार, आमीर खान यांपैकी कोणीच ही भूमिका करु शकणार नाही असंही सांगितलं होतं. ही भूमिका साकारण्यासाठी खूप प्रामाणिकपणा आणि निरागसतेची गरज असते आणि हे या अभिनेत्यांकडे नाही असेही ते म्हणाले होते. अशातच आता त्यांनी पुन्हा या प्रकरणावर भाष्य केले आहे. (mukesh khanna on ranveer singh)
मुकेश यांनी ‘बॉलिवूड ठिकाना’बरोबर संवाद साधला. यावेळी त्यांनी सांगितलं की, “शक्तिमानची भूमिका त्याला करण्यास द्यावी यासाठी रणवीर माझ्याकडे आला होता. हे मी लपवू शकत नाही. कारण लोक नंतर मी रणवीरचे कौतुक केले आणि त्याला एक चांगला अभिनेता म्हणालो असंही म्हणतील. यानंतर रणवीरच ही भूमिका सकारणार अशा चर्चादेखील सुरु झाल्या. पण अजूनही मी या निर्णयाशी सहमत नाही”.
पुढे त्यांनी सांगितले की, “माझे सोनी वाहिनीबरोबरदेखील वाद झाले होते. पण मी एक व्हिडीओ क्लिपद्वारे जाहीर केले होते की मी रणवीरला शक्तिमानची भूमिका साकारण्यासाठी मंजूरी देऊ शकत नाही. रणवीर माझ्यासमोर तीन तास बसला पण त्याच्या चेहऱ्यावर जे दिसायला पाहिजे ते नाही असं मला त्याला सांगावं लागलं. तो चंचल आहे आणि अशी व्यक्ती दुसऱ्यांच्या बोलण्यात येऊ शकते”.
दरम्यान आता मुकेश यांच्या या वक्तव्याची मनोरंजन क्षेत्रात खूप चर्चा होताना दिसून येत आहे. रणवीर खूप चांगला अभिनेता असला तरीही त्याने शक्तिमानची भूमिका करण्याला नेहमी आक्षेप राहील असे ते बोलत आहेत. त्यामुळे आता या चित्रपटामध्ये मुख्य भूमिका करण्यासाठी नक्की कोणाची वर्णी लागणार याकडे सगळ्यांचेच लक्ष लागले आहे.