बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेता गोविंदा आहुजा सध्या खूप चर्चेत आहे. आजवर गोविंदाने अनेक चित्रपटांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. त्याच्या भूमिकेला तसेच त्याच्या हटके डान्सला चाहत्यांची अधिक पसंती मिळते. त्याच्या व्यावसायिक आयुष्याबरोबरच खासगी आयुष्यामुळेही अधिक चर्चेत राहिला आहे. काही दिवसांपूर्वी घरीच पिस्तूल साफ करताना अनवधानाने गोळी सुटली आणि तो गंभीर जखमी झाला होता. त्यानंतर लगेचच त्याला रुग्णालयात दाखल केले आणि त्याच्यावर तातडीची शस्त्रक्रिया करण्यात आली. रुग्णालयात दाखल झाल्यानंतर तो बरा व्हावा यासाठी अनेकांनी प्रार्थनादेखील केल्या. त्याचवेळी गोविंदा व त्याचा भाचा कृष्णा अभिषेक यांच्यामध्ये असलेली भांडणंदेखील मिटताना बघायला मिळाली. (govinda and krushna abhishek fight)
काही दिवसांपूर्वी कृष्णाने मामा गोविंदासाठी एक भावुक पोस्ट केली होती. यामध्ये त्याने लिहिले होते की, “मी खूप हुशार आहे असं लोक म्हणतात. पण माझ्या शरीरात अर्ध रक्त जर गोविंदा मामा सारख्या हुशार माणसाचं असल्याने मी हुशार तर असणारच. खूप प्रेम चीची मामा. हे तुमच्यासाठी आहे. तुम्ही लवकर बरे व्हा. मला तुमच्याबरोबर नाचायचं आहे”. ही पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली होती. अशातच आता कृष्णा गोविंदाला भेटण्यासाठी त्यांच्या घरी पोहोचला.
गोविंदाच्या घरी पोहोचल्यानंतर कृष्णाने त्याच्या भावना व्यक्त केल्या. तो म्हणाला की, “चीची मामाबरोबर जी दुर्घटना घडली तेव्हा मी ऑस्ट्रेलियामध्ये होतो. मी माझा दौरा रद्द करणार होतो. पण रुग्णालयातील कर्मचारी व कश्मिरा बरोबर बोललो. तेव्हा सगळं ठीक असल्याचं सांगितलं गेलं आणि मी निश्चिंत झालो”.
पुढे तो म्हणाला की, “मी भारतात आल्यानंतर सात वर्षात पहिल्यांदाच मामाच्या घरी पोहोचलो. मी अर्धा वनवास पूर्ण केला असं मला वाटलं. मी त्यांच्याबरोबर एक तास वेळ घालवला आणि सात वर्षानंतर नम्मोला (टीना आहुजा) भेटलो. आमची भेट खूप भावनिक होती. मी त्यांना मिठी मारली. तसेच जे भूतकाळात घडले त्याबद्दल अजिबात चर्चा केली नाही”.
त्यानंतर तो म्हणाला की, “आम्ही भूतकाळात राहिलो नाही. आम्ही एक कुटुंबं आहोत त्यामुळे गैरसमज होणारच. पण अशा गोष्टींमुळे आम्ही अधिक लांब राहणार नाही. मामी खूप व्यस्त होती त्यामुळे आमची भेट होऊ शकली नाही. पण त्यांना भेटायला मी घाबरत होतो. त्या मला ओरडतील असं मला वाटलं. पण तुमच्याकडून काही चुका झाल्या तर मोठ्यांकडून ओरडा ऐकण्याचीदेखील तयारी ठेवावी. पण मी त्यांच्याकडे आता जात जाईन मामा-मामींना भेटेन”. दरम्यान आता मामा-भाच्यामधील वाद मिटताना दिसत आहेत.