Zee Marathi Awards 2024 Awards : आपण केलेला अभिनय प्रेक्षकांना आवडतो की नाही याची पोचपावती कलाकारांना सोशल मीडियावरून मिळतच असते. मात्र तरीही ती एका प्रतीकाच्या रूपात त्या चॅनलवरील अवॉर्ड्स मार्फत मिळते. त्यामुळे मालिकांमध्ये काम करणारे सर्वच कलाकार पारितोषिक सोहळ्यांसाठी फारच उत्सुक असतात. यापैकी एक महत्त्वाचा पूरस्कार सोहळा म्हणजे ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘झी पुरस्कार’. हा सोहळा म्हणजे डोळ्यांची पारणं फेडणारा सोहळा आहे. मालिकेतील कलाकारांचे दर्जेदार सादरीकरण व या सोहळ्याला येणारी विविध क्षेत्रातील पाहुण्यांची उपस्थिती यामुळे हा सोहळा अधिक रंगारंग ठरतो. अशातच नुकताच यंदाचा ‘झी मराठी अवॉर्ड्स २०२४’ हा भव्य पुरस्कार सोहळा पार पडला. (Purva Kaushik Emotional)
मराठी टीव्ही मनोरंजन क्षेत्रातील कलाकार ‘झी मराठी’च्या २५ वर्षाचा अद्भुत प्रवासाचा उत्सव साजरा करण्यासाठी एकत्र आले होते. कलाकारांच्या आगमनाबरोबरच रेड कार्पेट हा कलाकारांच्या वेगवेगळ्या लुकने भरलेला होता. यावेळी कलाकारांनी रेड कार्पेटवर पारंपरिक महाराष्ट्रीयन पोशाखांपासून आताच्या आधुनिक फॅशनपर्यंत हजेरी लावली होती. या सोहळ्यात अनेकांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. या भव्य सोहळ्याचे काही खास क्षण सोशल मीडियाद्वारे शेअर करण्यात आले आहेत आणि यापैकी एका प्रोमोने सर्वांचेच लक्ष वेधून घेतलं आहे.
आणखी वाचा – विमानतळावर ‘आई कुठे…’ फेम अभिनेत्री व कुशल बद्रिकेची भेट, तोंडभरुन कौतुक करत म्हणाली, “तुझा अभिमान…”
झी मराठीच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे एक प्रोमो शेअर करण्यात आला आहे, ज्यात पूर्वा कौशिक, राकेश बापट व नितीन चव्हाण हे भावुक झाल्याचे पाहायला मिळत आहे. झी मराठीने शेअर केलेल्या या प्रोमोमध्ये पुर्वाला तिच्या आई-वडिलांबरोबरचा फोटो भेट म्हणून देण्यात आला असून हा फोटो पाहून पूर्वा भावुक झाली. यावेळी तिने आपल्या भावना व्यक्त करत असं म्हटलं आहे की, “मी आणि आई-बाबा जेव्हा हा सोहळा घरी बसून बघायचो. तेव्हा माझे आई-बाबा होते. त्यांची खूप इच्छा होती की, मला हा पुरस्कार मिळावा. पण आज ते जेव्हा मिळालं तेव्हा ते नाहीत. आज आई-बाबा असते तर त्यांना खूप छान वाटलं असतं”.
दरम्यान, हा प्रोमो पाहून उपस्थितांच्याही डोळ्यात अश्रु तरळले असल्याचे पाहायला मिळत आहे. तसंच या प्रोमोखालीही नेटकऱ्यांनी तशा प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. “अभिनंदन पूर्वा”, “यासाठी तू नक्कीच पात्र आहेस”, तुझे खूप कौतुक”, “आम्ही तुमचा प्रवास पाहिला आहे अशीच कायम पुढे जा” अशा अनेक कमेंट्स करत पूर्वाच्या चाहत्यांनी तिचे कौतुक केले आहे.