‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘ठरलं तर मग’ ही मालिका सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. मालिका सुरु झाल्यापासून या मालिकेने टीआरपीच्या शर्यतीत आपलं स्थान अव्वल स्थानावर टिकवून ठेवलं आहे. अर्जुन-सायलीच्या जोडीला तर प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर उचलून धरलं आहे. याशिवाय मालिकेतील सर्वच कलाकार त्यांच्या अभिनयाने प्रेक्षकांची पसंती मिळवताना दिसतात. मालिकेत पुर्णा आजी ही भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचाही खूप मोठा चाहतावर्ग आहे. (Tejaswini Pandit On Jyoti Chandekar)
पुर्णा आजी ही व्यक्तिरेखा साकारणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांच्या तब्येतीसंदर्भात अपडेट्स समोर आले आहेत. ज्योती चांदेकर यांची लेक अभिनेत्री तेजस्विनी पंडित हिने त्यांच्या तब्येतीबाबत माहित समोर आणली आहे. बरेच दिवस मालिकेत पुर्णा आजी हे पात्र दिसत नाही आहे. त्यामुळे चाहत्यांमध्येही चिंतेचं वातावरण पसरलं होतं. त्यामुळे त्यांच्या चाहत्यांनी आईबद्दल तेजस्विनीकडे चौकशी केली.
तेजस्विनीने सोशल मीडियावरून एक पोस्ट शेअर केली होती. या पोस्टवर कमेंट करत चाहत्यांनी त्यांच्या लाडक्या पुर्णा आजीबद्दल विचारलं. दरम्यान नेटकऱ्यांच्या प्रेमापोटी तेजस्विनीनेही उत्तर दिलेलं पाहायला मिळालं. तेजस्विनीने शेअर केलेल्या पोस्टमध्ये एका डायरीच्या कोऱ्या पानावर तिनं स्वत:च्या अक्षरात दोन ओळी लिहिल्या आहेत. ‘मंजिल मिलेगी भटक कर ही सही, गुमराह तो वो है, जो घर से निकला ही नहीं’ असं तिनं लिहिलं आहे. या पोस्टवर चाहत्यांनी पुर्णा आजींबद्दल विचारपूस केली.
एका चाहत्याने कमेंट करत, “ते सगळं ठीक आहे, पण आम्हाला सांग पुर्णा आजी कुठे आहे?दिसत का नाही इतके दिवस? ती ठीक आहे ना?” अशी कमेंट करत काळजी व्यक्त केली. यावर तेजस्विनीने कमेंट करत, “ती आजारी होती. दोन आठवडे आयसीयूमध्ये. पूर्ण बरी झाली की पूर्णा आजी मालिकेत परत येईल”, असं सांगितलं. पुर्णा आजी म्हणजेच ज्योती चांदेकर यांची प्रकृती ठीक नसल्याने सध्या त्यांनी मालिकेतून ब्रेक घेतला आहे.