Gautami Deshpande and Swanand Tendulkar Wedding : सध्या सिनेसृष्टीत लगीनघाई सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. एकामागोमाग एक कलाकार लग्नबंधनात अडकत आहेत. काही दिवसांपूर्वीच प्रसाद जवादे-अमृता देशमुख, सुरुची अडारकर-पियुष रानडे, मुग्धा वैशंपायन-प्रथमेश लघाटे या जोड्या विवाहबंधनात अडकल्या. या कलाकारांचा अगदी शाही थाटामाटात लग्नसोहळा उरकला. त्यानंतर आता कलाक्षेत्रातील आणखी दोन जोड्या लग्नबंधनात अडकणार आहेत. अभिनेत्री स्वानंदी टिकेकर-आशिष कुलकर्णी आणि गौतमी देशपांडे व स्वानंद तेंडुलकर या जोड्यांचा विवाहसोहळा लवकरच संपन्न होणार आहे.
गौतमी देशपांडे व स्वानंद तेंडुलकरच्या लग्नाआधीच्या विधींना सुरुवात झाली असल्याचं पाहायला मिळत आहे. काही दिवसांपासून बहिणीच्या लग्नासाठी मृण्मयीची जय्यत तयारी सुरु असल्याचं पाहायला मिळत होतं. गौतमी स्वानंदच्या संगीत सोहळ्याचीही मृण्मयी जोरदार तयारी करत होती. तर बहिणीच्या केळवणाचाही थाटमाट मृणमयीने घातला होता. आज गौतमी व स्वानंद यांच्या मेहंदी सोहळ्याने लग्नाची उत्सुकता आणखी वाढवली आहे.
गौतमी देशपांडे व मृण्मयी देशपांडे यांचा मेहंदी सोहळ्यातील फोटो समोर आले आहेत. या फोटोमध्ये गौतमीच्या मेहंदीला सुरुवात झाली असल्याचं चित्र दिसतंय. मृण्मयीने शेअर केलेल्या या फोटोंमध्ये देशपांडे सिस्टर्सचा लूक लक्षवेधी ठरतोय. बहिणीच्या मेहंदीसाठी मृण्मयीने खास पारंपरिक लूक केलेला पाहायला मिळत आहे. मृण्मयीने खणाचा ड्रेस परिधान करत मराठमोळा लूक केला आहे. तर गौतमीने तिच्या मेहंदीसोहळ्यासाठी गुलाबी रंगाचा घागरा परिधान करत पारंपरिक लुकला मॉडर्न टच दिला आहे. दोघींच्या हातावरची नक्षीदार मेहंदी साऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहे.
पुढील दोन दिवसांत गौतमी देशपांडे व स्वानंद तेंडुलकर लग्नबंधनात अडकणार आहेत. कित्येक दिवसांपासून गौतमीच्या लग्नाच्या चर्चांना उधाण आलं होतं. स्वानंद तेंडुलकरबरोबर असलेल्या रिलेशनशिपमुळे गौतमी चर्चेत आली होती. आता या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. अखेर गौतमी व स्वानंद यांच्या लग्नाआधीच्या विधींना सुरुवात झाली आहे.