छोट्या पडद्यावरील ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही मालिका लोकप्रिय मालिकांपैकी एक मालिका आहे. कित्येक वर्ष सुरु असलेली ही मालिका प्रेक्षकांच्या मनावर आजही राज्य करत आहे. या मालिकेच्या कथानकाने आणि मालिकेतील कलाकारांमुळे ही मालिका प्रेक्षकांच्या आवडीची झाली आहे. विनोदी अशी ही मालिका प्रेक्षकांचं आजही भरभरून मनोरंजन करत आहे. या मालिकेतील जेठालालची भूमिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस पडली. (Dilip Joshi Son Wedding)
आपल्या उत्कृष्ट कॉमेडीने लोकांची मने जिंकणारा जेठालालबाबत नुकतीच एक आनंदाची बातमी समोर आली आहे. जेठालाल म्हणजे अभिनेते दिलीप जोशी यांच्या लेकाचा नुकताच लग्नसोहळा पार पडला आहे. दिलीप जोशी दुसऱ्यांदा सासरे झाले आहेत. त्यांचा मुलगा ऋत्विकचं नुकतंच लग्न झालं आहे. याचे अनेक फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ऋत्विकच्या संगीत सोहळ्यातील खास फोटो, व्हिडीओ समोर आले आहेत. यामध्ये दिलीप गाणं गाताना दिसत आहेत.
दिलीप जोशी यांचा मुलगा ऋत्विकचं १७ डिसेंबर रोजी विधिवत लग्न पार पडलं. ‘तारक मेहता’चे अनेक कलाकारही जेठालालच्या लेकाच्या लग्नात सहभागी झाले होते. तसेच दयाबेन म्हणजेच दिशा वाकानी ही अनेक वर्षांपासून या मालिकेपासून दूर होती. तिने देखील ऋत्विकच्या लग्नात हजेरी लावली होती. मुलाच्या लग्नात दिलीप जोशी यांनी शेरवानीसह गुलाबी पगडी परिधान केली होती. सोशल मीडियावर समोर आलेल्या या फोटो, व्हिडीओंवर चाहते भरभरून प्रेमाचा वर्षाव करत आहेत.
लग्नाच्या फोटोंनंतर आता ऋत्विकच्या संगीत व मेहंदी सोहळ्याचे फोटो दिलीप जोशी यांच्या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आले आहेत. यामध्ये दिलीप जोशी गाणे गाताना दिसले. तर एका फोटोमध्ये अभिनेता पत्नीच्या हातावर मेहंदी लावताना दिसले. अनेक कलाकार मंडळींसह लोकप्रिय गायिका फाल्गुनी पाठकनेही दिलीप जोशी यांच्या मुलाच्या संगीत सोहळयाला हजेरी लावली.