बॉलिवूड अभिनेत्री काजोलची आई व ज्येष्ठ अभिनेत्री तनुजा यांची प्रकृती अचानक खालवली होती. त्यानंतर त्यांना मुंबईतील जुहू येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. अभिनेत्रीवर आयसीयूमध्ये उपचार सुरू होते. तेव्हापासून तनुजा यांचे असंख्य चाहते त्या लवकरात लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करत आहेत. अशा परिस्थितीत तनुजा यांच्या प्रकृतीबद्दल एक मोठी अपडेट समोर आली आहे. तनुजा यांच्या प्रकृतीत आता सुधारणा होत असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्जही देण्यात आला आहे. (Actress Tanuja Discharged From Hospital)
‘पीटीआय’च्या वृत्तानुसार, तनुजा यांना सोमवारी रात्री उशिरा रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. त्यांच्या वयोमानानुसार काही शारीरिक आजारांमुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण आता त्या बऱ्या असून त्यांच्या तब्येतीत सुधारणा होत असल्यामुळे त्यांना घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे त्यांच्या चाहत्यांसाठी ही दिलासा देणारी बातमी आहे. अभिनेत्री तनुजा यांना रविवारी सायंकाळी मुंबईतल्या जुहूमधील रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते. वयोमानानुसार उद्भवत असणाऱ्या काही आजारांमुळे त्यांना रुग्णालयामध्ये दाखल केले असल्याचे म्हटले गेले होते.
चित्रपट निर्माते कुमारसेन समर्थ आणि अभिनेत्री शोभना समर्थ यांची मुलगी, तनुजा यांनी हिंदी व बंगाली चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यांनी मोठी बहीण नूतन यांच्याबरोबर बालकलाकार म्हणून ‘हमारी बेटी’ या चित्रपटापासून आपल्या करिअरची सुरुवात केली. ‘बहारें फिर भी आएंगी’, ‘पैसा या प्यार’, ‘हाथी मेरे साथी’ व ‘मेरे जीवन साथी’ अशा अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी विविध भूमिका साकारत प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे.
आणखी वाचा – दिग्दर्शक दिग्पाल लांजेकरांच्या ऐतिहासिक ‘शिवरायांचा छावा’ चित्रपटाची घोषणा, पोस्टरने वेधलं लक्ष
तनुजा यांचा जन्म २३ सप्टेंबर १९४३ रोजी झाला आहे. लहान वयातच त्यांनी आपल्या अभिनयाने सर्वांना चकित केले. वयाच्या अवघ्या १६व्या वर्षी तनुजा यांनी ‘छबिली’ या पहिल्या चित्रपटामध्ये काम केले होते. त्यांचा हा पहिला चित्रपट १९६० मध्ये प्रदर्शित झाला होता. तनुजा व चित्रपट निर्माते शोमू मुखर्जी यांनी १९७३ मध्ये लग्नगाठ बांधली होती. शोमू मुखर्जी व तनुजा यांना काजोल व तनिषा अशा दोन मुली आहेत.