‘’तारक मेहता का उल्टा चष्मा’ फेम शैलेश लोढा व या मालिकेचे निर्माते असित मोदी यांच्यामधील वाद जगजाहिर आहे. ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’चे निर्माते असित मोदी यांच्याविरोधात शैलेश यांनी तक्रार दाखल केली होती. २०२२मध्ये शैलेश या मालिकेमधून बाहेर पडले. याच वर्षाच्या सुरुवातीला असित मोदींच्या विरोधात त्यांनी खटला दाखल केला. वर्षभराच्या थकबाकीच्या मंजुरीसाठी राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरण (NCLT) शी संपर्क साधत शैलेश यांनी तक्रार दाखल केली. असित मोदी यांच्याविरोधातील खटला जिंकला असल्याचं शैलेश यांनी काही दिवसांपूर्वीच सांगितलं. आता याबाबत असित मोदी यांनी काही खुलासे केले आहेत.
‘टाइम्स ऑफ इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत असित यांनी सांगितलं की, “मी खटला जिंकलो आहे असं शैलेश यांनी सांगितलं. पण हे चुकीचं आहे. न्यायलाच्या आदेशानुसार आमच्या दोघांच्या सहमतीने हे शक्य झालं आहे. ते कोणताच खटला जिंकले नाही. शैलेश असं का बोलले? त्यांनी आरोप का केले? याचा आम्हीही विचार करत आहोत. असं नेमकं काय झालं की, त्यांना या स्थरापर्यंत जावं लागलं. एवढी मोठी कोणतीच गोष्ट घडली नव्हती. पण आतापर्यंत जे झालं ते झालं. यापुढे सगळं काही शांत होईल अशी आशा करुया”.
पुढे ते म्हणाले, “कोणत्याही कलाकाराला जेव्हा मालिका सोडायची असते तेव्हा त्याला काही कागदपत्रांवर सही करावी लागते. ज्यामध्ये कलाकार आता मालिका सोडत आहे आणि तो या मालिकेमध्ये आता काम करणार नाही असं नमुद केलेलं असतं. ही प्रक्रिया सगळ्याच कलाकारांना पूर्ण करावी लागते. शैलेश यांनी याच कागदपत्रांवर सही करण्यास नकार दिला. आम्ही त्यांचं मानधन रखडवलं नव्हतं. कागदपत्रांमध्ये काय चुकीचं आहे हेही मी त्यांना विचारलं. एकत्र बसून यावर मार्ग काढू असंही मी त्यांना म्हटलं. पण त्यांनी न्यायालयामध्ये खटला दाखल केला”.
आणखी वाचा – टाळ्या, शिट्ट्या अन्…; कोण कोणावर भारी? एकाच मंचावर गौतमी पाटील व माधुरी पवारची लावणी, व्हिडीओ व्हायरल
असित मोदी शैलेश यांना त्यांच्या कुटुंबातील एक सदस्य मानतात. “शैलेश यांनी आमच्याबरोबर १४ वर्ष काम केलं आहे. आमच्या कुटुंबातील ते एक सदस्यच आहेत. कामाव्यतिरिक्त इतर गोष्टींसाठीही आम्ही त्यांना पाठिंबा दिला. आम्ही वेळेवर शैलेश यांना मानधन दिलं. जोपर्यंत ते आमच्याबरोबर होतं तेव्हा सगळं काही ठिक होतं. पण जेव्हा त्यांनी हा शो सोडला तेव्हा सगळ्यांनाच धक्का बसला. अचानक त्यांनी ही मालिका सोडली. शैलेश यांच्या वागणूकीवर मी नाराज आहे. त्यांचं मानधन द्यायचं नाही असा आमचा कोणताच विचार नव्हता. एखादी कंपनी सोडत असताना कंपनीचे काही नियम पाळावे लागतात. त्यांनी ते केलं नाही”. आता शैलेश यावर काही उत्तर देणार का? हे पाहावं लागेल.