Suraj Chavan Bigg Boss Marathi Season 5 Grand Finale Winner : रीलस्टार सूरज चव्हाणने ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाची ट्रॉफी जिंकली आहे. तर अभिजीत सावंत उपविजेता ठरला. सर्वत्र सूरजचं भरभरुन कौतुक होताना पाहायला मिळत आहे. यंदाचं हे पर्व विविध क्षेत्रातील कलाकारांमुळे विशेष चर्चेत राहिलं. सूरज ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाचा विजेता ठरल्यावर मालिकाविश्वातील एका अभिनेत्याने केलेल्या पोस्टची विशेष चर्चा रंगलेली पाहायला मिळत आहे. सूरजला एका मोठ्या दिग्दर्शकाचा एक मोठा चित्रपट ऑफर करण्यात आला असल्याचे पाहायला मिळताच अभिनयाचं कोणतंही शिक्षण न घेता सूरजला एवढ्या मोठ्या बिग बजेट चित्रपटाची ऑफर मिळणं हे अनेकांना खटकलेलं दिसलं.
सूरजसाठी पोस्ट शेअर करत ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेतील कपिल होनरावने पोस्ट शेअर केली . मात्र ही पोस्ट करण्यामागे त्याला टोमणा मारण्याचा कोणताच उद्देश त्याचा नव्हता याबाबत आता कपिलने पुन्हा एकदा पोस्ट शेअर करत स्पष्टीकरण दिलं आहे. कपिलने पोस्ट शेअर करत, “देव सर्वांचं भलं करो. आई अंबाबाई तुम्हाला बुद्धी देवो. सर्व ट्रोलर्सवर माझी प्रतिक्रिया. मी कधी ही सूरज जिंकण्यासाठी पात्र नाही असं बोललो नाही. तो कसा जिंकला, त्याने जिंकू नये असं कधीच बोललो नाही. अथवा त्याच्या रीलवर काही बोललो नाही. ती पोस्ट खूप विचाराने पण त्यात काही लोकांना टोमणा वाटला.
आणखी वाचा – निक्की तांबोळी व अरबाज खानची घराबाहेर आल्यानंतर पहिली भेट, शेअर केला सेल्फी, आईच्या विरोधानंतरही नातं कायम
पुढे तो म्हणाला, “ते गोलमालमध्ये तुषारला बोलतात ना, ‘अरे नोकरी बी ले गया छोकरी बी ले गया’, तसं काहीसं. माझा विचार कदाचित चुकला असेल पण मला शिव्या घालण्याआधी माझ्याबद्दल माहिती करुन घेतली असती तर बरं झालं असतं. मी पण एका शेतकऱ्याचा मुलगा आहे. माझा बाप आजही शेतात राबतोय. लातूर पासून जवळपास १०० किलोमीटरवर माझं गांव आहे. सुल्लाली, अगदी डोंगराळ प्रदेश. शेतीमध्ये माती कमी आणि दगड जास्त आहेत. तिथून हा इथपर्यंतचा प्रवास माझ्यासाठी सोप्पा नव्हता. लहानपणापासून अभिनयाची आवडत होती. आणि १२ वी झाली की मुंबईला आलो. ओम पुरी, नसरुद्दीन शाह, चिन्मय मांडलेकर, अतुल कुलकर्णी , इरफान खान हे NSD मधून अभिनय शिकून कसे उत्तम अभिनेता म्हणून काम करतात याचा आदर्श ठेऊन आलो होतो. एनएसडीला मला जाता आले नाही पण थिएटर, बॅक स्टेज, एकांकिका करुन इथपर्यंत आलो. जे काही छोटंसं यश मिळालं हे त्यामुळेचं. कुठे तरी मुख्य भूमिका मिळावी म्हणून आज ही संघर्ष करतोय पण कुठे तरी मी कमी पडत असेल”.
आणखी वाचा – Video : बायको अभिजीत सावंतचे पुरवत आहे लाड, ७० दिवसांनंतर मालपोहा खाण्याचा आनंद, म्हणाला, “घरचं जेवण…”
पुढे तो असंही म्हणाला आहे की, “मी अजून तितका चांगला अभिनेता नसेन पण यांत सूरजला कुठे मी कमी लेखत नाही. त्या बिचाऱ्याने खूप वाईट दिवस पाहिलेत आणि आज त्याला जे काही मिळालं आहे ते त्याच्या मेहनतीने, साधेपणामुळे मिळालं आहे. माझ्या आणि त्याच्यात हाच फरक आहे की जे माझं आजही स्वप्न आहे ती त्याची रिऍलिटी आहे. ते तो जगतोय. तो सुपरस्टार आहे. एक ना एक दिवस माझाही येईल. माझा महादेवावर आणि आई अंबाबाईवर विश्वास आहे. त्यांच्यावर विश्वास ठेऊन मी माझी मेहनत करतोय आणि करत राहणार. ज्यांनी छान कमेंट करुन सपोर्ट केला त्यांना मनापासून धन्यवाद आणि बाकीच्यांचं देव भले करो”.