सध्या ‘बिग बॉस’चं १८ व्या पर्वाची धमाकेदार ओपनिंग झालेली पाहायला मिळाली. यामध्ये एकूण १८ सदस्यांनी सहभाग घेतला असून त्यांच्यामध्ये वाद सुरु झाल्याचे दिसून आले. ‘बिग बॉस’च्या या पर्वात एक मराठमोळा चेहरा बघायला मिळत आहे. मराठा आरक्षणामुळे चर्चेत राहिलेले वकील व डॉ. गुणरत्न सदावर्ते हे सहभागी झाले आहेत. ते यामध्ये आल्यापासून त्यांच्याबद्दल अनेक चर्चादेखील झाल्या. वकील म्हणून काम करताना त्यांना कोणत्या समस्या येतात याबद्दलही सांगताना दिसतात. अशातच आता ‘बिग बॉस’चा एक नवीन प्रोमो समोर आला आहे. यामध्ये गुणरत्न सदावर्ते दिसून येत असून या प्रोमोला चाहत्यांच्या खूप प्रतिक्रियादेखील मिळाल्या आहेत. (bigg boss season 18 promo)
दरम्यान गुणरत्न ‘बिग बॉस’मध्ये आल्यानंतर त्यांच्या वक्तव्यामुळे अधिक चर्चेत असतात. त्यांची मतं ते नेहमी मांडताना दिसतात. अशातच समोर आलेल्या प्रोमोमध्ये गुणरत्न तुरुंगात असलेल्या तेजिंदरपाल सिंह बग्गा यांना उद्देशून बोलताना दिसत आहेत. ते म्हणत आहेत की, “बग्गा सत् स्री अकालजी”, त्यावर हेमा शर्मा म्हणते की, “दरवेळी बग्गाजींना का हाक मारता? कधी तरी हेमा म्हणून पण हाक मारा”, त्यावर गुणरत्न म्हणतात की, “बग्गाजींचे माझ्या हृदयात एक वेगळे स्थान आहे. त्यांचं आणि माझं नातं कधीच तुटणार नाही. पहिल्यांदा त्यांना मोकळं करा आणि मगच जेवणाची चर्चा करा. बग्गाजींना तुरुंगातून सोडलं नाही तर लोकांमध्ये खूप असंतोष निर्माण होईल”.
तसेच नंतर ते त्यांच्या गॉगलबद्दलही बोलताना दिसत आहेत. तसेच ते पुढे म्हणाले की, “कोणामध्ये माझ्याशी लढण्याची हिम्मत आहे का?”, दरम्यान या प्रोमोमध्ये ते व्यायाम करतानादेखील दिसत आहेत. त्याचप्रमाणे त्यांचा रागही कळून येत आहे. दरम्यान हा प्रोमो व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनीदेखील प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. नेटकऱ्यांना गुणरत्न यांचा अंदाज पसंत पडत आहे.
एका नेटकऱ्याने लिहिले आहे की, “हा माणूस खूप विनोदी वाटत आहे”, तसेच दुसऱ्या एका नेटकऱ्याने लिहिले आहे की, “यांचा विनोदी अंदाज खूप आवडला आहे”, अजून एका नेटकऱ्याने लिहिले आहे की, “हे पर्व खूप छान होणार आहे असं वाटत आहे”.