स्टार प्रवाह वाहिनीवरील अनेक गाजलेल्या मालिकांपैकी एक म्हणजे ‘सुख म्हणजे नक्की काय असतं?’. या मालिकेने आतापर्यंत जवळपास ९०० भागांचा टप्पा यशस्वीपणे पार करत प्रेक्षकांचे मनोरंजन केलं आहे. आता मालिकेत एक नवीन ट्विस्ट येणार आहे. येत्या २० नोव्हेंबरपासून गौरी-जयदीपच्या पुनर्जन्माची कथा पाहायला मिळणार आहे. त्यामुळे मालिकेतील अनेक कलाकार नव्या भागात आता दिसणार नाहीत.
नवीन भागात मालिकेतील माधवी निमकर, कपिल होनराव, अर्पणा गोखले, गणेश रेवडेकर, भक्ती रत्नपारखी असे बरेच कलाकार दिसणार नसल्याची चिन्ह आहेत. म्हणूनच काही कलाकार सोशल मीडियावर भावुक पोस्ट शेअर करताना दिसत आहेत. अशातच आता मालिकेतील देवकी म्हणजेच अभिनेत्री भक्ती रत्नपारखीने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. याआधी मालिकेत अभिनेत्री मिनाक्षी राठोडने देवकी हे पात्र साकारले होते. पण नंतर तिच्याजागी भक्तीने ही भूमिका साकारली आणि याबद्दलचीच एक भावुक पोस्ट तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे शेअर केली आहे.
आणखी वाचा – नातवासह आदेश बांदेकरही झाले लहान, धमाल-मस्तीचे फोटोही केले शेअर, लेक म्हणतो, “आताच डोक्यावर बसला आणि…”
या पोस्टमध्ये तिने “मॅडहेड’ देवकी माझ्याबरोबर नेहमी राहील… आज माझा ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मधला शेवटचा एपिसोड… पण हे ‘सुख’ माझ्याबरोबर नेहमी राहील… मी कोणाची तरी रिप्लेसमेंट केलेलं हे माझं पहिलं पात्र… ते ही इतकं महत्त्वाचं आणि गाजलेलं… ज्यात मी कधीच बोलले नाही ती भाषा मला बोलायची होती… खूप वेगळ्या शेड्स होत्या…” असं म्हटलं आहे. यापुढे तिने दिग्दर्शक चंद्रकांत कणसे यांचे आभार मानत, “ही भूमिका करताना त्यांची खूप मदत झाली. त्यांच्या काम करण्याच्या पद्धतीने अभिनेत्री म्हणून मला खूप छान घडवलं आहे, खूप शिकवलं आहे. तुम्ही ग्रेट आहात आणि तुमच्याबरोबर काम करण्याची संधी मला यापुढेही मिळूदेत” असं म्हटलं आहे. यापुढे तिने पूर्ण दिग्दर्शन टीम, कॅमेरा टीम, मेकअप टीम, हेअर टीम व स्पॉट दादा या सगळ्यांनाही धन्यवाद म्हटले आहे. तसेच “कोठारे व्हिजनबरोबर काम करायची ही फक्त सुरुवात आहे. अजून खूप चांगलं काम आपल्याला करायचं आहे…” असं म्हणत कोठारे व्हिजनबरोबर काम करण्याची ईच्छादेखील व्यक्त केली आहे.
यापुढे तिने मालिकेतील तिच्याबरोबरचे सहकलाकार व चॅनेलचेही आभार मानले आहेत. यानंतर “तुम्ही मला देवकी म्हणून स्वीकारलं. माझ्यावर प्रेम केलं. माझा आत्मविश्वास वाढवला. तुम्ही आहात म्हणून आम्ही कलाकार आहोत. तुमचं मनोरंजन करायची संधी मला मिळत राहू देत. तसेच लवकरच एका नवीन भूमिकेतून भेटू” असं म्हणत तिने प्रेक्षकांनाही धन्यवाद म्हटले आहे.