Amruta Deshmukh Prasad Jawade Marriage : अभिनेत्री अमृता देशमुख व अभिनेता प्रसाद जवादे यांचा शाही विवाहसोहळा नुकताच संपन्न झाला आहे. आज शनिवार (१८ नोव्हेंबर) रोजी प्रसाद -अमृता अखेर बोहोल्यावर चढले आहेत. नुकतेच त्यांच्या लग्नसोहळ्याचे खास फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. प्रसाद -अमृताच्या शाही विवाहसोहळ्याला मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकार मंडळी उपस्थित होते. दरम्यान त्यांच्या लग्नापूर्वीच्या विधींची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे.
अमृता-प्रसाद यांच्या लग्नाचा लूक समोर आला आहे. दोघांची ओळख ते त्यांचे आताचे नव्या आयुष्यातले पाऊल या सर्व गोष्टी सांगीतिक पद्धतीने पत्रिकेद्वारे मांडत त्यांनी पाहुणे मंडळींना आमंत्रण दिलं होतं. तळेगाव, पुणे येथील एका फार्महाऊसवर त्यांचा विवाह सोहळा पार पडला आहे. सप्तपदी घेतानाचा नव्या नवरा-नवरीचा फोटो समोर आला असून या फोटोने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. मुंडवळ्या घालून सजलेल्या या नवरा-नवरीचा हा लूक लक्ष वेधून घेत आहे. गुलाबी रंगाच्या डिझायनर साडीत नव्या-नवरीचं सौंदर्य खुलून आलं असून पिवळ्या रंगाच्या कुर्त्यामध्ये नवरा मुलगा सप्तपदी घ्यायला सज्ज झाला आहे. सप्तपदी घेताना प्रसादने अमृताला अलगद असं जवळ घेत सप्तपदीची विधी पूर्ण केली आहे.
अमृता-प्रसादच्या लग्नातील फोटो समोर आले आहेत. अमृताने परिधान केलेल्या लाल लेहेंग्यात तिचं सौंदर्य खुलून आलं आहे. तर प्रसादने पांढऱ्या रंगाची शेरवानी आणि पांढरा फेटा परिधान केला असून अमृताच्या लाल लेहेंग्याला साजेशी अशी ओढणी ही घेतली आहे. त्यांचे हे फोटो पाहून नव्या नवरीचं रूप खुलून आलं आहे. गडद लाल रंगाच्या लेहेंग्यात अमृताच्या सौंदर्याने सर्वांनाच भारावून टाकले आहे. तर प्रसादने पारंपरिक कुर्ता व स्टाईल यांचा उत्तम मेळ साधला आहे.
प्रसाद-अमृताचा लग्नाचा लूक पाहता ही जोडी नजर लागण्याइतकी सुंदर व लक्षवेधी दिसत आहे. अमृता-प्रसादने सोशल मीडियावर त्यांच्या मेहंदी, हळदी कार्यक्रमातील फोटो शेअर केले आहेत. तसेच त्यांच्या संगीत सोहळ्यातील धमाल-मस्तीचे अनेक व्हिडीओही चांगलेच व्हायरल झाले होते.