अभिनेत्री सुकन्या मोने या मराठी मनोरंजन सृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहेत. गेली अनेक वर्षं त्या विविध नाटकं, मालिका, चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आल्या आहेत. त्यांच्या कामाबरोबरच त्या त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत असतात. सुकन्या मोने या उत्तम अभिनेत्री असण्याबरोबरच एक उत्तम खवय्यादेखील आहेत. त्यांना वेगवेगळे पदार्थ बनवायला आणि ते इतरांना खाऊ घालायलाही खूप आवडतं.
अशातच आज होळीनिमित्त सर्वत्र आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण आहे. होळीनिमित्त आज सर्वत्र होलिका दहनाच्या खास कार्यक्रमाबरोबरच पुरणपोळीचाही खास बेत असतो. होळी रे होळी पुरणाची पोळी असं म्हणत आजच्या या खास सणाचे सेलिब्रेशन केले जाते. त्यामुळे आजच्या होळीच्या खास दिनाचे औचित्य साधत सुकन्या मोने यांनी होळीच्या आदल्या दिवशी खास पुरणपोळीचा बेत केला आहे.
सुकन्या मोने यांनी इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे एक खास व्हिडीओ शेअर केला आहे, जात त्या पुरणपोळी करताना दिसत आहेत. भाग्यश्री करंदीकर यांनी सुकन्या मोने यांच्या पूरणपोळी बनवण्याच्या कृतीचे कौतुक करत असं म्हटलं आहे की, “खूप जास्त व्यस्त असणाऱ्या सुकन्याताई, होळीच्या एक रात्र आधी पुरणपोळ्या करत आहेत. आपल्या घरच्या मंडळींना त्या त्या सणाला एक सुटेबल पदार्थ मिळण्याची त्यांची ही आवड आणि एक तळमळ यातून दिसून येते.”
तसेच यापुढे त्यांनी “हे खूपच प्रेरणादायी आहे” असं म्हणत “तुमचे हे कष्ट शेअर केल्याबद्दल खूप धन्यवाद आणि होळीच्या लाख लाख शुभेच्छा” असंही म्हटलं आहे. या व्हिडीओमध्ये सुकन्या मोने या अगदी आनंदात पुरणपोळ्या करताना पाहायला मिळत आहेत. दरम्यान, त्यांच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर लवकरच त्या आगामी ‘नाच गं घुमा’ या चित्रपटात पाहायला मिळणार आहेत.