बॉलिवूडमधील काही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक म्हणजे जान्हवी कपूर. जान्हवी ही आपल्या स्टायलिश फोटोनी सोशल मीडियावर कायमच सक्रिय असते. तिच्या अनेक फोटोला चाहत्यांकडूनही चांगलाच प्रतिसाद मिळतो. मात्र आपल्या ग्लॅमरस अंदाजाबरोबरच अभिनेत्री देवाच्या भक्तीभावातही तितकीच तल्लीन होते. जाहवीने याआधी अनेकदा तिरुपतीचे दर्शन घेतले आहे. मात्र ती नुकतीच तिच्या वाढदिवसानिमित्त पुन्हा एकदा तिरुपतीला गेली होती जान्हवीने ६ मार्च रोजी २७ वा वाढदिवस साजरा केला, त्याच्या आदल्या दिवशी ती तिरुमाला मंदिरात पोहोचली होती.
अलीकडेच जान्हवी शिखर पहाडिया व ऑरी यांच्यासह तिरुपतीमध्ये दर्शनासाठी गेली होती. याचे काही फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. अशातच आता आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे, ज्यात जान्हवी चक्क गुडघे टेकून तिरुपती मंदिराच्या पायऱ्या चढताना दिसली. सोशल मीडिया स्टार असणाऱ्या ऑरीने त्यांनी घेतलेल्या दर्शनाचा व्लॉग तयार करत तो युट्यूबवर पोस्ट केला आहे.
यावेळी व्लॉगमध्ये जान्हवी असं म्हणाली की, “देवाच्या भेटीचा हक्क कमावणे गजरेचे आहे आणि तोच हक्क मिळवण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. मी याआधी मंदिराला सुमारे ५० वेळा भेट दिली आहे आणि भगवान बालाजीसमोर माझी इच्छा पूर्ण करण्यासाठी मी गुडघे टेकत या मंदिराच्या पायऱ्या चढल्या आहेत.”
दरम्यान, या व्लॉगमध्ये त्यांनी आधी जान्हवीच्या एका नातेवाईकांकडे जेवण केले आणि त्यानंतर अनवाणी पायाने मंदिराच्या पायऱ्या चढायला सुरुवात केली. त्यांनी जवळपास ३६०० पायऱ्या चढल्या. यावेळी ऑरीची चांगलीच दमछाक झाल्याची पाहायला मिळाली. मात्र जान्हवी व शिखर अगदी सहजरित्या मंदिराच्या पायऱ्या चढल्याचे या व्हिडीओमध्ये पाहायला मिळाले.