‘स्टार प्रवाह’ वाहिनीच्या सर्वच मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडताना दिसतात. या मालिकांच्या यादीत एक मालिका नेहमीच लोकप्रियतेच्या शिखरावर राहिली. इतकंच नव्हेतर ही मालिका सुरु झाल्यापासून टीआरपीच्या शर्यतीतही आपलं स्थान टिकवून असलेली पाहायला मिळत आहे. या मालिकेचं नाव आहे ‘ठरलं तर मग’. अल्पावधीतच लोकप्रिय झालेली ही मालिका प्रेक्षकांची आवडती मालिका आहे. या मालिकेच्या कथानकाने मालिकेच्या प्रेक्षक वर्गाला आपलंस केलं आहे. (Tharal Tar Mag Top In TRP)
या मालिकेतील कथानकाबरोबरचं मालिकेतील कलाकारांनीही मालिकेची उंची वाढविली आहे. या मालिकेतील सायली व अर्जुनच्या जोडीवर तर प्रेक्षक भरभरुन प्रेम करताना दिसत आहेत. याशिवाय मालिकेतील इतरही पात्रे प्रेक्षकांच्या मनात घर करुन आहेत. मालिकेत सध्या महीपत विरोधात अर्जुनने केस जिंकली असून महिपतला अटक झालेली पाहायला मिळत आहे. आणि यासाठी सायलीने मदत केल्याने सगळेजण सायलीचं कौतुक करताना दिसत आहेत.
तर एकीकडे सायली व अर्जुन यांच्यातील प्रेमाचं नातं बहरत जात असल्याचं दिसत आहे. अर्जुन सायलीच्या प्रेमात पडला असून तो सायली बरोबरचे कॉन्ट्रॅक्ट मॅरेज विसरला आहे. त्यामुळे आता अर्जुन सायलीसमोर प्रेमाची कबुली केव्हा देणार याकडे साऱ्यांच्या नजरा वळल्या आहेत. मालिकेत आलेल्या टर्न आणि ट्विस्टमुळे ही मालिका अधिक लोकप्रिय झाली असून टीआरपीच्या शर्यतीत प्रथम क्रमांकावर आहे. टीआरपीच्या शर्यतीत अव्वल स्थान टिकवून ठेवल्यामुळे मालिकेतील कलाकारांनी आनंद व्यक्त केला आहे.
अभिनेता अमित भानुशाली म्हणजेच अर्जुन आणि अभिनेत्री जुई गडकरी म्हणजेच सायलीने यासंदर्भात चाहत्यांसह आनंदाची बातमी शेअर केली. अमित-जुईने शेअर केलेल्या पोस्टरवर “८.९ TVR सह ‘ठरलं तर मग’ मालिका महाराष्ट्राची नंबर १ मालिका”, असं नमूद केलं. ही पोस्ट शेअर करत जुईने ‘यासाठी मी ऋणी आहे’, असं कॅप्शन दिलं आहे. सध्या ही मालिका सर्वत्र नंबर १ वर असून मालिकेला भरभरुन प्रतिसाद मिळत आहे. यंदाच्या ‘स्टार प्रवाह पुरस्कार’ सोहळ्यातही मालिकेचं खूप कौतुक झालेलं पाहायला मिळालं.