‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या मालिकेला प्रेक्षकांची बरीच पसंती मिळाली. मात्र मालिकेत आलेल्या टर्न आणि ट्विस्टमुळे ही मालिका प्रेक्षकांची नावडती मालिकाही झाली. सुरुवातीला मालिकेत अक्षरा-अधिपती यांचं अनोखं नातं पाहायला मिळालं, तेव्हा ते पाहणं प्रेक्षकांना फार आवडत होतं. मात्र कालांतराने मालिकेच्या कथानकात आलेल्या बदलामुळे म्हणजे अक्षरा व अधिपती यांच्यात झालेल्या ताटातूटमुळे प्रेक्षकांनी मालिकेला ट्रोल करायला सुरुवात केलं. (Tula Shikvin Changalach Dhada Serial Troll)
मालिकेत सध्या अक्षरा व अधिपती यांच्यातील वाद कमी झालेले दिसत आहेत. तर अक्षरालाही अधिपतीच्या घरी राहण्याची परवानगी भुवनेश्वरी यांच्याकडून मिळाली आहे. तर एकीकडे अक्षरा अधिपतीच्या घरी आल्यानंतर भुवनेश्वरी खूप खुश असते. कारण अक्षराचा सूड उगवण्यासाठी तिची तयारी सुरू झालेली असते. मात्र भुवनेश्वरीचा प्रत्येक डाव अक्षरा ओळखून असते. तीदेखील आता तिला यावर उत्तर देण्यासाठी तयार असते.
मालिकेत भुवनेश्वरीच्या नवऱ्याची वाचा परत आलेली असते. वाचा परत येताच चारुहासने भुवनेश्वरीचा खरा चेहरा अक्षरासमोर आणला आहे. भुवनेश्वरी अधिपतीची जन्मदाती आई नसल्याचं सत्य चारुहासने अक्षराला सांगितलं आहे. अशातच आता मालिकेचा प्रोमो नुकताच समोर आला आहे. या प्रोमोमध्ये भुवनेश्वरी चारुहासला धमकावताना दिसत आहे. “या सगळ्याला तुम्ही जबाबदार आहात, चारुहास सूर्यवंशी. स्वतःला आवरा आणि नीट वागा, नाहीतर एका बाईची हाय तुम्हाला नाही तुमच्या अख्ख्या वंशाला गिळून टाकल”, असं म्हणत ती चारुहासला धमकी देते.
हा प्रोमो पाहून आता प्रेक्षकांनी मालिका बघणं बंद केली असल्याचं म्हणत या प्रोमोवर नाराजी व्यक्त केली आहे. “खूप खूप जास्त कंटाळवाणं करत आहेत. मी बघणं बंद करुन पण खूप दिवस झाले पण अजून तेच चालू आहे. लवकर काहीतरी चांगलं दाखवा, नाहीतर TRP नाही म्हणून मालिका बंद करावी लागेल”, असं एका नेटकऱ्याने म्हटलं आहे. तर आणखी एकाने, “आम्ही तर बघणे केव्हाच बंद केले, आणि इथे दाखवले जाणारे प्रसंग बघितले की ही मालिका बघत नाही हेच बरे, हे पटते”, असं म्हटलं. “मालिका बघणं आम्ही तर केव्हाच बंद केलं. इथे इथे जे काही दाखवतायत ते बघण्यापेक्षा बंद केले हेच योग्य झाले, असे वाटते”, असं म्हटलं आहे.