‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘आई कुठे काय करते’ ही मालिका सध्या एका रंजक वळणावर आली आहे. अरुंधतीचा नवा प्रवास नव्या वेळेत पाहायला मिळत असून या मालिकेला प्रेक्षक वर्ग भरभरुन प्रतिसाद देताना दिसत आहेत. मालिकेत आलेल्या रंजक वळणांमुळे ही मालिका बरेचदा ट्रोलिंगची शिकारही झाली. असं असलं तरी मालिकेच्या कथानकाने मालिकेच्या प्रेक्षकांना जोडून ठेवलं आहे. सध्या मालिकेत अरुंधतीवर ओढावलेल संकट पाहायला मिळत आहे. (Aai Kuthe Kay Karte Promo)
आशुतोषचा अपघात झाल्याने अरुंधतीवर खूप मोठे संकट आलं आहे. अरुंधती आशुतोषच्या जाण्याने दुखावली असून ती या धक्क्यातून सावरण्याचा प्रयत्न करत आहे. आशुतोषच्या मृत्यूचं खापर अरुंधतीच्या माथ्यावर फोडून सुलेखा ताईंनी अरुंधतीला घराबाहेर काढलं आहे. त्यामुळे सध्या ती देशमुखांच्या घरी राहायला आलेली पाहायला मिळतेय. मालिकेच्या नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये असं पाहायला मिळत आहे की, होळीनिमित्त देशमुखांच्या घरी धुळवड साजरी करण्यात येत आहे. यावेळी सगळेजण एकमेकांना रंग लावत असतात.
मालिकेत धुळवड सुरु असताना अरुंधती बाहेर येते आणि ती आशुतोषच्या आठवणीत रमते. तितक्यात समोरुन अनिरुद्ध येतो आणि तो अरुंधतीला रंग लावून ‘हॅपी होळी अरुंधती’ असे म्हणतो. अनिरुद्ध अरुंधतीला रंग लावताच अरुंधती अनिरुद्धच्या सणसणीत कानाखाली लगावते आणि ‘रंग लावायचा हक्क फक्त आशुतोषला आहे, आणि कायम त्यांनाच राहील’ आहे असं म्हणते. त्यांनतर ती तिथून निघून घरात जाते. त्यावर सगळेजण चकित होऊन पाहू लागतात. त्यानंतर तिथे संजना येते आणि अनिरुद्धला म्हणते ‘चेहऱ्यावरचा रंग उडाला की रे तुझ्या, हॅप्पी होळी’ असं म्हणत त्याला रंग लावते.
मालिकेच्या येणाऱ्या भागात अरुंधती अनिरुद्धच्या सणसणीत कानाखाली लागवताना दिसते. अनिरुद्ध याचा बदला घेणार का?, की संजना या आगीत तेल ओतण्याचे काम करणार?, हे पाहणं मालिकेत रंजक ठरणार आहे.