स्टार प्रवाह वाहिनीवरील सर्वच मालिका या प्रेक्षकांच्या नेहमीच पसंतीस असतात. टीआरपीच्या शर्यतीतही ही मालिका नेहमीच अव्वल स्थानावर असते. नवनवीन कथानक घेऊन या वाहिनीवर मालिका या येत असतात. अशातच एका नव्या मालिकेने या वाहिनीवर एंट्री घेतली आहे. ही मालिका म्हणजे ‘घरोघरी मातीच्या चुली’. मालिकेचे प्रोमो सध्या साऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहेत. एका सुखी कुटुंबाची गोष्ट या मालिकेत दाखवण्यात येत आहे. रेश्मा शिंदे व सुमित पुसावले यांच्या मुख्य भूमिका असणाऱ्या या मालिकेच्या नव्या प्रोमोवर मात्र नेटकरी नाराज झाले आहेत. (Gharoghari Matichya Chuli Serial Troll)
मालिकेचे दोन नवे प्रोमो पाहून नेटकऱ्यांनी मालिकेला ट्रोल करायला सुरुवात केली आहे. मालिकेच्या एका प्रोमोमध्ये सुमित एका मनुष्याचा जीव वाचवण्यात यशस्वी होतो. त्यानंतर गावकरी त्याला देवाची उपमा देत त्याचा दुधाने अभिषेक करतात. सुमित याआधी बाळुमामाच्या नावाने चांगभलं या मालिकेत बाळूमामांची भूमिका करत होता. हा नवा प्रोमो पाहून नेटकऱ्यांनी, “अरे त्यांचा बाळुमामांंचा रोल संपला आहे आता”, “नायक या हिंदी चित्रपटात सेम असाच सीन आहे”, “अनिल कपूर च्या नायक चित्रपटाचा छोटा व्हर्जन”, “नायक सिनेमा कॉपी”, अशा कमेंट करत मालिकेला ट्रोल केलं आहे.
तर मालिकेचा दुसऱ्या प्रोमोमध्ये अभिनेत्री रेश्मा शिंदे तिच्या मुलीला गोष्ट सांगताना दाखवली आहे. एक मुलगी तिच्या आयुष्यात आलेल्या मुलासोबत लग्न करते आणि त्याची बायको बनून घरात जाते असं सांगत असतात सासूची भूमिका साकारणाऱ्या सविता प्रभुणे म्हणतात, “तिने लाखोंची नोकरी न घेता गृहिणी व्हायचं ठरवलं. त्या तिच्या त्यागाचं तिच्या सासूसासऱ्यांना खूप कौतुक आहे”. हे पाहून अनेक नेटकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

एका नेटकऱ्याने लिहिलं आहे की, “हे २०२४ सुरू आहे. आता बायका घर आणि करिअर दोन्ही उत्तमरीत्या सांभाळतात. ही तुमची लीड काय आदर्श ठेवते आहे? ती स्वतः दोन्ही गोष्टी करायला असमर्थ आहे म्हणून ती घरी बसली. २२ वर्षांपूर्वीची कथा सांगितली तर लीडपण असेच उपदेश देणार”. आणखी एकाने लिहिलं, “त्यात काय त्याग आहे मोठा, यांना त्याग शब्दाचा अर्थ समजावून सांगा”. आणखी एकाने लिहिलं, “किती चुकीचा संदेश देतायत या सिरीयल. चांगलं खातं पितं घर आहे. सासू, आजे सासू, सगळे आहेत. घरात नोकर आहेत मग नोकरी करायला काय प्रॉब्लेम आहे?”.