सध्या सर्वत्र अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा २’ या चित्रपटाची चर्चा सुरु आहे. काही दिवसांतच म्हणजे येत्या ५ डिसेंबर रोजी हा चित्रपट संपूर्ण देशात प्रदर्शित होणार आहे. २०२१ साली आलेल्या ‘पुष्पा’ या चित्रपटाने चांगलाच धुमाकुळ घातला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसचे सगळेच रेकॉर्ड मोडले होते. या चित्रपटातील मुख्य भूमिका साकारलेल्या अल्लू अर्जुनला सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून राष्ट्रीय पुरस्कारदेखील मिळाला. आता दूसरा भाग येणार असून सर्वजण त्याची आतुरतेने वाट बघत आहेत. चित्रपटाच्या प्रमोशनसाठी अल्लू अर्जुन व रश्मिका मंदना अनेक ठिकाणी हजेरी लावताना दिसून आले आहेत. दरम्यान एका मुलाखतीवेळी त्याने हिंदी चित्रपटांमध्ये काम न करण्याबद्दल भाष्य केले होते. (allu arjun on bollywood movies)
‘पुष्पा २’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी अल्लू अर्जुन मुंबईमध्ये दाखल झाला होता. यावेळी त्याने खुलासा केला की दिग्दर्शक सुकुमारने त्याला राष्ट्रीय पुरस्कार मिळवून देण्यासाठी चांगला चित्रपट बनवण्याचे आश्वासन दिले होते. तो म्हणाला की, “हे खूप खास आहे. कारण गेल्या ६९ वर्षात कोणत्याही तेलगू अभिनेत्याला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला नव्हता. हे माझ्या खूप मनात होतं. माझ्या आयुष्यातील सगळ्यात मोठं यश आहे. हे केवळ सुकुमारमुळे शक्य झालं आहे”.
याचवेळी अल्लू अर्जुनने संगीत दिग्दर्शक देवी श्री प्रसाद यांच्याबरोबर असलेल्या घनिष्ठ नात्याबद्दलदेखील भाष्य केले आहे. अल्लू अर्जुन म्हणाला की, “मी त्यांना हिंदी चित्रपट न करण्याबद्दल विचारायचो. ते म्हणायचे की नाही. ते मला पुन्हा विचारायचे की तुम्ही हिंदी चित्रपट का नाही करत? त्यावर मी म्हणायचो की मी कधीही हिंदी चित्रपट करणार नाही. कारण त्यावेळी हिंदी मनोरंजन चित्रपटसृष्टीमध्ये स्वतःची जागा निर्माण करणं खूप कठीण होतं”.
दरम्यान ‘पुष्पा २’ या चित्रपटाबद्दल सांगायचे झाले तर, यामध्ये रश्मिका मुख्य नायिका आहे. तसेच खलनायक म्हणून अभिनेता फहाद फाजील दिसून येणार आहे. लाल चंदन तस्करी यावर आधारित असणाऱ्या चित्रपटांमध्ये दमदार फाईट सिक्वेस पाहायला मिळणार आहेत. ५ डिसेंबर २०२४ रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.