सध्या ‘पुष्पा २’ या चित्रपटाची चर्चा सर्वत्र सुरु आहे. पहिल्याच दिवसापासून या चित्रपटाने सर्वच चित्रपटांचे रेकॉर्ड मोडले आहेत. अल्लू अर्जुन व रश्मिका मंदना यांची मुख्य भूमिका असणाऱ्या या चित्रपटाने जगभरात कोट्यावधी रुपयांची कमाई केली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन सुकुमार यांनी केले आहे.. लवकरच या चित्रपटाचा तिसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचे दुसऱ्या भागामध्ये जाहीर करण्यात आले होते. मात्र चित्रपटाच्या दुसऱ्या भागाचे यश साजरे करत असतानाच गालबोट लागले. ‘पुष्पा २’ चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या आदल्या दिवशी म्हणजे ४ डिसेंबर रोजी हैद्राबाद येथील प्रीमियर सोहळ्यादरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या प्रकरणी अल्लू अर्जुनला अटक करण्यात आली होती. (pushpa 2 director sukumar)
अल्लू अर्जुनच्या अटकेनंतर त्याला लगेचच अटकपूर्व जामीन मंजूर झाला होता. तसेच त्यानंतर काही दिवसांत त्याच्या घरावर हल्लादेखील करण्यात आला होता. दरम्यान चेंगराचेंगरी प्रकरणी मंगळवारी अल्लू अर्जुनची पोलिसांकडून कसून चौकशीदेखील करण्यात आली होती. यावेळी दिग्दर्शक सुकुमार हे त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे बघायला मिळाले. मात्र अशातच आता सुकुमार यांनी एक वक्तव्य करत चाहत्यांना जोरदार झटका दिला आहे.
सुकुमार नुकतेच हैद्राबाद येथील एका सोहळ्यामध्ये उपस्थित राहिले होते. यावेळी त्यांनी मनोरंजन क्षेत्र सोडणार असल्याची घोषणा केली आहे. सुकुमार यांचे हे वक्तव्य ऐकून चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. सुकुमार यांच्याबरोबर दाक्षिणात्य अभिनेता राम चरणदेखील सहभागी झाला होता. यावेळी सुकुमार यांना विचारले की, “अशी एक कोणती गोष्ट आहे जी तुम्हाला सोडायची आहे?”, यावर सुकुमार यांनी उत्तर दिले की, ‘चित्रपट”. सुकुमार यांचे उत्तर ऐकून राम चरणला देखील आश्चर्य वाटले. तो लगेच सुकुमार यांच्या हातातील माइक खेचून घेतो. तसेच असे काहीही होणार नसल्याचे तो सांगतो.
सुकुमार यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यावर आता नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. एका नेटकऱ्याने लिहिले की, “हे सगळं संध्या थिएटरमध्ये घडलेल्या प्रसंगामुळे झाले आहे”. दुसऱ्या एका नेटकऱ्याने लिहिले की, “अल्लू अर्जुनमुळे सुकुमार चिंतेत आहेत”. त्यामुळे खरंच सुकुमार चित्रपटसृष्टी सोडणार का? असा प्रश्न चाहत्यांच्या मनात निर्माण झाला आहे.